सुंदर देखणी, रुपाची खाण असणारी ललना, मोकळे सुंदर केस आपल्या कोमल हातानेच लिलया फिरवत जेंव्हा तुळशीवृंदीवनापाशी दिसते.. किंवा सकाळी आपल्या कुटुंबियांसाठी चहा-न्याहारीची व्यवस्था करते.. किती मस्त वाटतं ना पाहूनच. पण आजकाल अशा घटना फक्त जाहिरातीत किंवा सिनेमा-सिरियल यातच दिसतात. अशा महिला खरच आहेत का आणि त्या खरच इतक्या निवांत आणि प्रसन्न चित्त असतात का, असा प्रश्न माझ्या सारखीला हमखास पडतो. त्याचं कारणही तसंच आहे म्हणा. मी माझ्या लहानपणापासून माझी आई, मावशी, आत्या, काकू, मामी, शेजार पाजारच्या महिला यांना, सकाळी उठून घराची अवराअवर, स्वयंपाक, मुलांच्या अंघोळी, डबे, नवऱ्याला हवे नको ते पहाणे व मग स्वतःची कामावर जायची घाई असंच चित्र पाहिलंय. अगदी ९०च्या दशकाआधीपासूनच महिलांची धावपळ करत काम करण्याची पद्धत पाहिलीय. पण तरी आजही २१ व्या शतकात प्रश्न असा असतो की,
समाजात वावरणारी स्त्री कशी असते, कशी असावी, कशी दिसावी, कशी रहावी, कशी वागावी... हे सगळं समाजच ठरवतो. हरकत नाही ठरवा. पण मग ती एकटीच घर-संसार सांभाळत असेल तर तिला मदतीला किंवा सहकार्याला आपला हातभार लागावा असा तरी प्रामाणिक प्रयत्न असायला हवा. खरच तसा प्रयत्न करणारे ७० टक्के प्रामाणिक पुरुष असतातही. मात्र उर्वरित वर्गाचे काय?
अनेकांना प्रश्न पडला असेल, ही आकडेवारी आली कुठून? तर मी केलेला हा प्रयोग तुम्हीसुद्धा करून पहा.. सोसायटी, अपार्टमेंट, चाळ, झोपड्या इथली १० घरं निवडा. तीन घरातली निष्क्रीयता स्पष्टच दिसेल. यामध्ये पुरुषांना दोष देऊन निवांत बसल्या तंगड्या पसरून मजा बघत, असा 'तथाकथित' भाव नाही. मुळात प्रत्येकाला स्वतंत्रतेने जगणयाचा अधिकार, हक्क आहेच की पण सद्सद् विवेकबुद्धी जागृत असायलाच हवी. कोण, कोणाला, कधी, कुठे, कसा बोलतो यावर अनेक तर्क-वितर्क होत असतात. अन्यथा ती व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही असो, व्यक्ती सोकावली आणि काळ बोकाळला तर सांगणार तरी कोणाला ? याला केवळ वर्षानुवर्षे महिलेतल्या 'देखणेपणाची वर्गवारी' करणाऱ्या डुड्डाचार्यांपुरते मर्यादित ठेवावे, म्हणजे बरे, नाही का?!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा