कष्टाळू माता

 माझी आई

नवदुर्गेची चौथी माळ 🙏😇

"प्रज्ञा जरा खोब्र खोऊन दे गं", असं म्हणून तिने माझ्या हाती काम सोपवलं. ते काम छोटंच होतं पण माझ्या छोट्याशा हातांना करवंट्या चांगल्याच टोचत होत्या पण तरी एखादं काम दिलं की ते नेटानं करायचं ही बहुदा आम्हा मेषवाल्यांची सवयच. आई असूनही तिने माझ्यात व भावात कधी भेदभाव केला नाही. दोघांना सर्व काही समान! भले माझी बुद्धी भावाच्या तुलनेत ना के बराबर😅 पणतरीही  संधी समान दिल्या जात.


पुण्या जवळच्या केडगावचा जन्म, लहानपणी बऱ्याच आजारातून ती बरी झालेली. पण कष्ट वाट्याला अफाट.. एकदा तिच्या आईला अचानक चक्कर आली आणि विहिरीतून दोन हंडे घेऊन चढतअसताना ती पाहिऱ्यांवर बसली, कळशी-हंडा विहिरीत पडले आणि आजी वाचली. तेंव्हापासून आईच्याच वयाचा भाचा जगदीश व आई व धाकटा भाऊ सुभाष असे सगळेच मिळून कावडीनेपाणी भरत असत. लागेल ती मदतताईला म्हणजेच आईला करणे हा छंदच जडला जणू. त्यानंतर शिक्षणासाठी इतर भावंडांसोबत ११वीत पुण्यात आली. पण शिक्षणाचे तीनतेराच वाजले. पण शिक्षण घेण्यासाठी अर्धवेळ काम करत शिकण्याचा प्रयत्नही केला, पण भाचा पायावर पडला आणि पायमोडला, आणि शिक्षणाला खो बसला तो कायमचाच. 

पण भावांकडे राहून तिने स्वतःचे छोटेमोठे काम सुरूच ठेवले. १९८३साली लग्न होऊन सुमती अवचटची ती सुप्रिया बाळकृष्ण कुलकर्णी झाली. आणि पुण्यातून सांगलीत आली. पुढच्याच वर्षी घरी दोन पाळणे हलले. कारण मी आणि भाऊ जुळे जन्माला आलो☺

एकाचवेळी मुलगाही मिळाला आणि मुलगीही. पण राहणे खेडेगाव असलेल्या कवठेपिरान इथे असल्याने सोयीसुविधांचा आभावच. मग आम्ही ३वर्षाचे झाल्यावर शिक्षणानिमित्त सांगलीत दाखल झालो. आमच्या शिक्षणा सोबतच आईने शिक्षिकेची नोकरी सुरू केली, ती देखिल बाबांच्या मनाविरुद्ध. बाबांचा महिलांच्या नोकरीला विरोध होता. पण नंतर दूधाचे पैसे व घरभाडे वसूल होतायत हे लक्षात आल्यावर तो मावळला. आईला व भावाला अचानक दम्याचा त्रास सुरू झाला. तो त्रास इंजेक्शन दिल्याशिवाय काम करणे शक्य नसे. त्यातच संसाराचा गाडा ती हाकत होती.समाधानाची एकच बाबा होती ती म्हणजे मुलगा प्रशांत शिक्षण, विविध स्पर्धा, म्हणजे चित्रकला, गायनवक्तृत्व, लेखन अशा सगऴ्यातच घवघवीत यश मिळवत असे. "बाईंचा मुलगा मोठा हुशार", असे शब्द कानावर पडले की आईला बरे वाटे पण इतक्यात, "पण बाईंची मुलगी तशी सोसोच" हे ऐकून तिला फार वाईट वाटे. आता मात्र ते सो सो म्हणणारे तोंडात मारल्यागत मूग गिळून गप्प आहेत.😅 असो



आईने आमच्या दोघांच्याशिक्षणासाठी फार खस्ता खल्ल्या. मुलाची हुशारी ओळखून आधीच ठरवले, याला शिक्षणासाठी पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी या शाळेत टाकायचे. सुदैवाने मुलगा हुशार असल्याने सहजी  पूर्व परीक्षा पास झाला व प्रवेश मिळाला. भावाला हॉस्टेलवरच ठेवलं. आईचं पुणे माहेर असल्याने व धाकट्या मीना मावशीने शाळेजवळच घर घेतल्याने सोयही चांगली झाली. 
थोडे सुखाचे दिवस जातात नाही तोवर भावाला पळवून नेलं आणि मग तोसुखरूप परतल्याची बातमी आली आणि सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. व्रात्य प्रवृत्तीच्या भावाला अद्दल घडली पण आता त्याला बाहेर ठेवण्याचं वडलांनी अमान्य केलं आणि ८वी ते १०वी पुन्हा सांगलीतून शिक्षण घेऊन त्याला परत ११वीपासून पुण्याला पाठवला. त्याला इंजिनिअर करण्यासाठी मावशी व आई-वडलांनी फिया भरल्या व स्वप्न सत्यात उतरलं. मी MA Journalism करत असतानाच भाऊ इन्फेसिसमध्ये लागला व मला स्टार माझात नोकरी मिळाली. 


आईचा संस्कार वर्ग

आमच्या सर्वांगीण विकासासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न केले. सांगलीत व आतापुण्यातही तिचे संस्कार वर्ग मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत पाया मजबूत करतायत. आईची प्रत्येक ठिकाणी कसोटी लागत होती, पण त्या सर्व कसोट्यांमधून ती खरी उतरली. आजही वयाची ७० ओलांडून तिचा उत्साह माझ्या दुप्पट आहे.  नवनिर्मितीचा तिला प्रचंड ध्यास असल्याने स्वयंपाक घरातही ती रमते आणि मी शेतकऱ्याची लेक म्हणत, झाडं, फुलं वेली तिचे जीव की प्राण.  आम्ही लहानअसताना घरा समोर भरपूर ऊन असल्याने, ते वाया जाऊ न देता☺ कुरडया-पापड्यांचा घाट आतला जाई, त्यातले निम्मेतर वाटण्यातच जाई. कांदा भजी जरी केली तरी ते वाटण्यातच जाई, मग मी फार चिडायचे, "करून लोकांना का वाटते"?, तर म्हणायची "दिल्याने कमी होत नाही". तीच सवय आता हळू हळू माझ्याही अंगवळणी पडतेय.


अशा या कष्टाळू महिला आपल्या अवतीभोवती असल्यानेच मोठी ताकद मिळते , उमेद मिळते जगण्याची. स्वतःसोबत इतरांचं कल्याण करणाऱ्या अनेक महिलांचं वर्णन मी माझ्या पद्धतीने करत आहे. खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या..


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान