खूप विचार करण्याची मला लहानपणापासूनच सवय आहे. एखादा चुकीचा जरी वागला किंवा वागली तरी मी आधी त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करते की हा किंवा ही असं का बरं बोलले वागले असतील. कारण मुळात मी फटकळ म्हणूनच प्रसिद्ध. तरी मी आता बरीच मवाळ झाले. कदाचित आता काहीही झालं तरी मुंबईत रहावं लागणार हे लक्षात आल्यानं गेल्या ७-८ वर्षात मी अशी झाले आहे कदाचित. १८ वर्षांपूर्वी मुंबईत आले तेंव्हा कुणाचीही भिडभाड न ठेवता तोंडावर वाजवून येणारी मी, आता गेल्या काही वर्षात तोंडावरची माशीही न हलल्याप्रमाणे चेहेरा स्थिर ठेऊन निमूट सहन करते. म्हणतात ना घर पहावं बांधून... त्यातली गत झालीय. पण अध्यात्म तरी दुसरं काय आहे? 'मी जे जगतेय ते जगणं ही नियतीची इच्छा आहे. आणि यातून परमार्थ शोधणे हे जीवनाचे मर्म आहे.' पण हे जर समजलं तर जगही जिंकणं कठीण नाही पण नाही जमलं तर मात्र जग तुमच्यावर हसल्याशिवाय राहणार नाही.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात देव आपल्याला सगळे रंग दाखवतो. मग ते कधी निसर्गाचे असतात, कधी नात्यातले असतात, कधी मित्र-मैत्रिणींचे असतात, तर कधी सोबत काम करणाऱ्यांचे असतात. या सगळ्या रंगात आपणही अनेकदा रंगून जातो, आनंदून जातो आणि कधी असे गहिरे रंग दिसतात की जे कधी दिसू नयेत पण दिसतात. या रंगात रंगूनही ज्याचा पाय मोकळा राहतो तो 'स्वत्व' टिकवून ठेवतो. वर्षाला निरोप देणं असो की आपल्या आयुष्यातल्या काही वर्षांचा उहापोह असो, काय कमावलं गमावलं यापेक्षा, खरंच काय आणि किती टिकवलं हे पाहाणं ही खरी हिशोबाची गोळाबेरीज असेल, नाही का!
त्यात सगळ्यात मोठा फटका म्हणा किंवा नियतीच्या इच्छेने तिने दिलेला प्रसाद म्हणा... मी ऑक्टोबरमध्ये दणदणीत अनुभव घेतले. चांगल्यांची मदत आणि वाइंटाचे टोमणे याचाही उत्तम अनुभव गाठीशी बांधला गेला....

अध्यात्मावर माझा प्रचंड विश्वास असला तरी, मी चमत्कारावर जास्त विश्वास ठेवत नाही. पण जरी चमत्कारावर विश्वास नसला तरी घडलेल्या चमत्कारिक गोष्टी, मला चमत्कारावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात.
कारण त्याचे उदाहरण, मी स्वतःच आहे..
४ऑक्टोबररोजी ऑफिसला जाताना मी लोकलमधून उतरताना पडले. आणि एकही ओरखडा न उठता, थेट गुडघ्याच्या आतील लिगामेंट फाटली म्हणजे अस्थिबंधनच फाटले.. आणि ते तीन ठिकाणी फाटले गेले होते. त्यामुळे चालणं अशक्यच झालं. पण लिगामेंटबद्दल झालेली दुखापत ही बाहेरून कळत नसल्याने मला चालता का येत नाही, असे वाटून, ते पाहण्यासाठी उभी राहिले की गुडघ्याची वाटी फिरू लागली.. अखेर मला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला.. घडलेला प्रकार तातडीने ऑफिसला कळवला. नशिबाने तिथे ऑफिसमधलाच एक सहकारी कृष्णा कामानिमित्त मुंबई सेंट्रल स्थानकावर आला होता.. त्याने मला व्हिलचेअरपासून ते रुग्णालयापर्यातचा प्रवास घडवला.. दरम्यानच्या काळात ऑफिसमधून निखिला, म्हणजे माझ्या immediate bossने सुमितला देखिल पाठवले होते... तो दिवस कसाबसा गेला आणि सहा दिवसांनी MRI मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.. तब्बल ९ ऑर्थोपेडिक आणि इतर अॅलोपथी डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासच सांगितले.. त्यानंतर आमचे चॅनेल हेड उमेश कुमावत सरांनी मात्र मला धीर देत सांगितलं, प्रज्ञा ऑपरेशन हा लास्ट ऑप्शन ठेव, आधी आयुर्वेदिक उपायांनी कसं वाटतं ते पाहा. आणि मी वैद्यांना याबाबत विचारण्यास सुरूवात केली.. वैद्य उर्मिला पिटकर यांनी त्यांचे मित्र वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर हे यातील अतिशय़ तज्ञ असल्याचे सांगितले आणि मग आम्ही तात्काळ त्यांच्याच सल्ल्यानुसार काही काळ मिरारोड येथील वैद्य अभिजीत दुर्गे यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर थेट पुण्यातल्या औंधमध्ये पंचकर्म चिकित्सालयात वैद्य धोपेश्वरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली, स्नेहन- स्वेदन, तैलधारा, अन्न लेप, पिंडस्वेद, बस्तीस अग्नीकर्म अशा उपचारांना सुरूवात झाली आणि केवळ ३० दिवसात मी दुखऱ्या पायावर व्यवस्थित उभी राहू लागलो आणि ३५ दिवसात कोणत्याही आधाराशिवाय चालण्यास सुरूवात झाली. आणि चमत्कार म्हणतात तो या पेक्षा वेगळा नाही याचाही अनुभव आला.
मुळात जिथे पडल्यापासून २१ दिवसांनी ऑपरेशन आणि ६ आठवडे वा त्यापेक्षा जास्त bed rest चा सल्ला देणारे, alopathy डॉक्टर्स होते, म्हणजे तब्बल ३ महिन्यांचा काळ हा experiment वरच जाणार होता, त्यापेक्षाही निम्म्या काळात मला स्वतःच्या पायावर आणि कोणत्याही आधाराशिवाय चालण्याची किमया वैद्य धोपेश्वरकर यानी आयुर्वेदाच्या जोरावर करून दाखवली.. हे आयुर्वेद करू शकतो यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. माझे मित्र-मैत्रिणी-नातेवाईक अक्षरशः अवाक झाले. सध्या हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही कळकळीची एकच विनंती, आपलं मूळ म्हणजे आयुर्वेदच, फक्त विश्वास हवा आणि हो, तसे वैद्यही ! जे मला आजवरच्या आयुष्यात पावलोपावली लाभले,. तसेच ते तुम्हालाही लाभो, व सुदृढ आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏😇

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा