म्हणजे काय असतं?

 ३० जानेवारी २०२२ रोजी स्फुरलेली कविता

जन्माला येणं म्हणजे काय असतं
कधी वस्तूरुपी तर कधी जीवरूपी पिल्लू असतं
एखाद्याच्या तपश्चर्येचं फळ असतं
मेहनत अन् कष्टाचं चीज असतं
आणि सरते शेवटी पुन्हा नव्याने जन्माला घालणारं रोपटंही असतं

जीवन जगणं म्हणतात ते काय असतं
प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य असतं
निखळ विचार अन् निखळ हास्य असतं
गरजेला मदतीचा हात देणं असतं
आणि सरते शेवटी कष्टाच्या कमाईचे दोन घास  मिळणं असतं

सुख सुख म्हणतात ते काय असतं
ऐशो-आरामी जीवन जगणं असतं
हसत-बागडत फक्त मजेचं जीवन असतं
खरं तर हे अनेकांचं बालपण असतं
आणि सरते शेवटी भय-चिंतेचा लवलेशही नसणं हेच सुख असतं

जगातलं सर्वात सुंदर नातं नेमकं काय असतं
आई अन् बाऴाचं प्रेम असत
मित्र-मैत्रिणींतलं निखळ नातं असतं
नवरा-बायकोतलं सुख असतं
परिवारातलं समाधान असतं
आणि सरते शेवटी गुरू-शिष्याचं जन्मोजन्मींचं नातं असतं

काम काम ते काय असतं
कुणी नोकरी तर कुणी चाकरी करत असतं
कुणी उद्योग तर कुणी धंदा करत असतं
कुणी शेतात राबून सोनं पिकवत असतं
आणि सरते शेवटी पोटाची खळगी भरवणारा 'दाम' देणारं, केलेलं काम असतं

आयुष्य आयुष्य म्हणतात ते काय असतं
बालपणात बेरजेचं गणित असतं
तारुण्यात गुणाकारात तोलत असतं
म्हातारपणात बरचसं वजा करत असतंं
आणि सरते शेवटी भागून उरलेलं प्रामाणिकतेचं आरोग्यरुपी बक्षिस असतं

आणि
भंगार भंगार म्हणतात ते काय असतं
मित्रा-मित्रातलं वितुष्ट असतं
भावाभावातलं भांडण असतं
नातेवाईकातलं अबोलपण असतं
आणि सरते शेवटी राजकारणातलं राजकारण असतं 
©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान