अबोलाचे बोल

 "तू मला आज गम्मत देणारे", अतिशय कुतूहलभरल्या चेहेऱ्याने माझ्या पाच वर्षाच्या लेकाने मला प्रश्न केला होता. पण दीड तास वेळ घालवून कसेबसे  जेवणाऱ्या लेकाला मी उत्तर दिले, " हो तर, तुझ्या स्वप्नात येऊन देणारे मी गम्मत!" नवराही जेऊ घालण्याच्या कसरतीत सहभागी असल्याने तो ही दमला होता, पण आमचा संवाद ऐकून त्याला हसू अवरेना.. या सगळ्यात Confuseचेहेरा करत माझ्या लेकाने पुन्हा मला विचारलं, "आता हे मम्मं संपवल्यावर, तू मला गम्मत देणार ना?" पुन्हा मी, "बाळा, मी स्वप्नात येऊन मगच गम्मत देणार हं तुला." मग हसू अवरत, त्याचा बाबा न राहून म्हणालाच, "सगळे येडं बनवण्याचे धंदे सुरू आहेत तुझ्या आईचे." असो, हा संवाद नमूद करण्यामागचं कारण, एवढासा मुलगा आम्हाला ब्लॅकमेल करण्याचे नवनवे फंडे कसे, कुठून शोधून काढतो याचं आम्हाला कोडं आहे पण तो बोलू लागला याचा आनंदही वेगळाच आहे..



मुळात माझ्या लहानपणी मी लहान मुलांमध्ये खूप रमायचे, खूप खेळायचे. आणि लहान मुलं नसलीच तर वयस्क आजी-आजोबा खास करून अज्जी लोकांशी माझी खूप चांगली गट्टी जमायची. आता माझाच मुलगा ५वर्षाचा झालाय.. पण मुलांना पूर्ण वेळ सांभाळणे व खोडकरपणा, अवखळपणा, निरागसतेचा कहर सहन करत सांभाळणे, आग-पाणी यांबद्दल भितीच नसल्याने ते खेळ समजणे व ते खेळ नाही हे समजावणे.. हे सारे टास्क मी सध्या अनुभवते आहे.😊

 आई व मुलगा सेम दाखवण्याचा मी केलेला अट्टहास☺

माझा मुलगा ३ वर्षाचा होऊन गेला तरी बोलत नव्हता, अर्थात मी स्वतःच साडेतीन वर्षाची झाल्यावर  बोलू लागले होते, त्यामुळे हे आनुवंशिक असू शकते असा अंदीजही आईने वर्तवला होताच. आणि अनेक हितचिंतकांनी त्यावर अनेक तोडगेही सुचवले होते. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही त्याला speech therapyसाठीही न्यायला सुरुवात केली. पण तो बोलत नाही याचं माझ्यापेक्षा माझ्या आसपासच्या परिचित वा अपरिचित सर्वांना फार टेंशन असे. तो बोलावा यासाठी त्याला संध्याकाळी ५ ते १० सांभाळायला येणाऱ्या बाईने पण पोपटाने खल्लेले चॉकलेट, बिस्किट त्याला खाऊ घालून पाहिले, पण कसचेकाय.. अखेर पावणे चार वर्षाचा झाल्यावरच तो बोलू लागला. मग आम्हाला त्याचे काय कौतुक! त्याचे एक एक शब्द आम्हाला फुलांप्रमाणे भासत. आणि आता तो ५ वर्षाचा झाल्याने वाक्ये तयार करून बोलण्याचा प्रयत्न करतो, हे पाहून आम्ही अजूनच सुखावतो... अर्थात सर्वसामान्यपणे जी मुले ३वर्षाची झाल्यावरच बऱ्यापैकी छान बोलू लागतात, तिथे ५व्या वर्षात कौतुक ते काय?


 

आणि माझ्या लहानपणी  मी बोलायचेच नाही आणि माझा जुळा भाऊ झोपेपर्यंत बोलतच असतो, याचे माझ्या आईला फार टेंशन होते.. ही मुकी होते की काय अशी शंका तिला होती. एक तर काळी-सावळी त्यात मुकी म्हंटल्यावर उजवायची कशी? असा त्या काळातला यक्ष प्रश्न तिला थोडा काळ भेडसाऊन गेला खरा. पण डॉक्टरांनी तिच्या शंकेचे निरसन केले आणि तिचा जीव भांड्यात पडला. आणि कर्म-धर्म संयोगाने पुढे बोलण्याचेच क्षेत्र करिअर म्हणून निवडावेसे वाटले, हे ही नवलच! 

शेवटी कितीही बोललो, तरी अबोलाचेच बोल खरे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान