मनमिळाऊ सासूबाई

माझ्या सासूआई

नवदुर्गेची पाचवी माळ 🙏😇 

"काही झालं तरी शेक-शेगडी घ्यायचीच प्रज्ञा आणि बाळाला किमान वर्षभर मसाज हवा, तूपण ६ महिने घ्यायला हवा, पुढचं तुम्ही ठरवा." बाळंतपणानंतरचे हे शब्द आहेत सासूबाईंचे, गम्मत म्हणजे आई शेजारी उभी. पण तिला मुलं होऊन ३५ वर्ष झाल्याने काहीच आठवत नव्हतं. पण सासूबाईंनी लागलीच त्यांच्या लेकाला कामाला लावलं, इथे कोळसे कुठे मिळतात ते शोधून काढायला सांगितलं. कारण या वास्तूत येऊनच आम्हाला केवळ वर्ष झालेलं, इथलं काहीच माहिती नाही, पण तरी त्यांनीच विचारपूस करून ३ बायकांपैकी एक बाई मसाजसाठीही निश्चित केली. आता तिच आमच्या इमारतीत जन्मलेल्या पाचव्या बाळाच्या मसाजसाठी येतेय.☺ बरं ते कोळसे मोठ्या गॅसवर चांगले तापू द्यायचे आणि मग मोठ्या घमेल्यात घालून आणायचे, बाळाला शेक द्यायचा व मीही घ्यायचा हा रोजचा शिरस्ता. यामुळे गॅसबिलानं पार २०००चा टप्पा ओलांडला पण त्याची फिकिर त्यांनी मुळीच केली नाही. आणि घरी केलेले डिंकाचे लाडू, मी तर खायचेच पण घरी सगळेच खायचे.


कोणाला काय म्हणायचं हे आपल्यासमाजाने आधीच ठरवून ठेवलेलं आहे.  आणि ९९टक्के ठिकाणी ते अगदी रास्त आहे. पण जिथे माया-प्रेमाची भाषा असते आणि तथाकथित समाजाने त्या नात्याला आसुया, तिटकारा, तिरस्काराचे रूप देऊनच रंगवून ठेवलेले असते, त्यामुळेच बहुदा नातं निर्माण होण्याआधीच पूर्वग्रह दोष उत्पन्न होत असावेत. आणि अनेक सुना त्यालाच बळी पडून दूषणमाला सुरू करत असाव्यात. 



औरंगाबादच्या विजयालक्ष्मी देशमुख या १९८०साली लग्न होऊन, विजयालक्ष्मी शशिकांत हस्तक झाल्या. त्याकाळचं मॅट्रिक झालेलं. घरी लहान दोन दीर सासू-सासरे व अत्ये सासूबाई असा परिवार. पण तरीही खासगी नोकरी करत, त्यांनी सगळ्या घरच्यांना आपलंसं केलं. पुढच्याच वर्षी पाळणा हलला आणि संदीप म्हणजे माझ्या नवऱ्याचा जन्म झाला. काहीच वर्षात मुलगी आरती जन्मली. माझे सासू-सासरे नोकरीवर जाणारे त्यामुळे या दोन्ही मुलांना त्यांच्या  सासू-सासऱ्यांनी छान सांभाळलं. शाळेला सोडणं आणणं, जेवणखाण, खेळ, सगळंच छान सुरू होतं. सणावाराला त्यांच्याकडे फारच मजा असे. कमितकमी ४० लोक येत असत, मग त्यांच्या पंगती बसत. शिवाय सोबत रात्रीसाठी जेवणाचे डबे दिले जात. एकत्र राहण्यात तेंव्हा फार मजा असे, असं त्या आजही आवर्जून सांगतात. 

हसतमुख, प्रसन्नचित्त ही त्यांची पहिली ओळख. घरातल्या कोणाला किंवा घरी येणाऱ्या ओळखीच्या व्यक्तिला कसलाही त्रास असेल किंवा घरच्यांना कितीही आजारपणं आली तरी त्याला त्या धीरानं सामोऱ्या जातात, समोरच्याला धीर देतात. नावीन्याचा स्वीकार करण्याची त्यांना फार आवड. नवनवीन गोष्टी त्या जाणून घेत असतात. मला जी बंधनं आईकडून होती ती सगळी मोडीत काढून त्या मला फॅशन करा, अत्ताच वय आहे असंही सांगतात. नोकरी सांभाळत घर पाहाणं अवघड असल्याचं जाणूनच त्यांनी पोळीसाठी बाई लावण्याचा हट्ट धरला, व तो माझ्यासाठी फायद्याचाच ठरला. पुढील धोके ओळखून काम करण्याची त्यांची होतोटी चपखल असल्याने अनेक धोके आपोआप टळतात. हे देखिल अनेकदा अनुभवास आलं आहे.

फिरायला जा, मजा करा असं त्या वारंवार सांगतात पण आमच्या कामाच्या स्वरुपात ते फार कमीच शक्य होतं.

आईची माया सासू कधीच देत नाही असं म्हणतात. पण मुळात त्या मायेची ऊब आपण अनुभवू शकत नाही का? असा प्रश्न आपणच स्वतःला करायला हवा. आपण आपल्या जागी योग्य असे आपल्याला वाटते, तसेच ते समोरच्यालाही वाटतच असते.


अशा स्त्रिया आपल्या आसपास असल्यानं जगण्याची कला समजते. जोखडात न अडकता, टिका टिप्पणीला भाव न देता, आणि स्वतःसोबत इतरांचं कल्याण करणाऱ्या अनेक महिलांचं वर्णन मी माझ्या पद्धतीने करत आहे. खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान