आई असावी तर अशी!
माझी अत्या!
नवदुर्गेची पहिली माळ🙏😇
मी विदुला सोबत खेळत होते, संध्याकाळची वेळ होती. इतक्यात तिची आई आणि माझी अत्या अष्ट्याहून लगबगीनं आली, खांद्यावरची पर्स काढून खुंटिला लटकवली, हात-पाय तोंड स्वच्छ धुतलं आणि आम्हा दोघींकडे पाहून विचारलं, काय खाणार उप्पीट की पोहे, लगेच विदुलानं उत्तर दिलं पोहे, मग मलाही विचारलं, तू पण खाशील ना? मी जरा चाचरतच होकारार्थी मान हलवली. अत्या हसली आणि लगेच कामाला लागली.. तोवर श्रीपाद दादा 'भूक लागली, आई काय करणारेस?' असं विचारत अत्यापाशी आला, अत्याने लगेच विचारलं, अरे माधव कुठे, 'तो क्लासला गेलाय' असं म्हणत दादा पोहे बनण्याची वाट पाहू लागला.. थोड्याच वेळात माधव दादा आला, मग आम्ही सगळे गोल करून पोहे खात बसलो, आणि तिकडे अत्याने चार घास खाऊन चहा पिऊन, स्वयपाकालाही सुरुवात केली होती...
मी पाहातच राहिले, कारण अत्या अष्टा-सांगली प्रवास काही आज करत नव्हती, ती प्रोफेसर असल्यानं रोजचाच तिचा हा प्रवास होता. पण ८ तासाचा बोलण्याचा जॉब करून, २ तासाचा रोजचा STचा प्रवास करूनही ती तशीच फ्रेश होती. याचं मला कोडकौतुक वाटायचं. तिचा हा टवटवीतपणा मला खूप भावला. १९७१ पासून कासेगाव एज्युकेशन सोसायटी अष्टा इथं इंग्रजीची प्राध्यापक म्हणून नोकरी केली व २००१मध्ये प्राचार्य असतानाच सेवानिवृत्ती घेतली.
तासगाव हे सांगली जिल्ह्यातलं तसं सुपरिचीत गाव पण पूर्वीच्या काळी नोकरीनिमित्ताने राहतं घर सोडून जाणं ही काळाची गरज बनू लागली होती. अत्याचं मूळ गाव तासगाव, तिचे वडिल प्राथमिक शाळेचे शिक्षक होते. पण कामानिमित्त ते सांगलीत आले. अत्याचं माहेरचं नाव पुष्पा वामन पुराणिक, ७वी पर्यंत मुरलीधर मराठी शाळेत ती शिकली मग ११वी पर्यंत सांगलीतल्याच सिटी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढे शिकायचं होतंच पण वडिल म्हणाले, "हे पाहा पुष्पा, तुमचं सगळं शिक्षण पूर्ण करण्यात मी वेळ घालवणार नाही, चांगलं स्थळ आलं की लग्न करून मोकळं होणार, पुढे काय शिकायचं तर शिका!" असा सल्ला वजा इशाराच त्यांनी दिला होता. योगायोगाने चांगलं स्थळ चालून आलं आणि मग १९६२ साली तिचं लग्न झालं.. मग पुष्पाची, मंगल शामराव जोशी झाली. शामरावांचा स्वभाव अतिशय शांत, मनमिळाऊ.. पण आता तिला शिकण्याची मनातली धग शांत बसू देईना, घरच्यांच्या परवानगीने तिने १९६५ ते १९६८ सांगली डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये टायपिस्ट म्हणून नोकरी सुरू केली आणि त्याच वेळी सांगली collegeमधून पदवीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मग willingdon college सांगलीतून ती MA झाली. आणि घरात सगळ्यांनाच आनंद झाला. कारण जोश्यांकडे आलेल्या पुष्पाने म्हणजे आताच्या मंगलने १९७० मध्ये स्वतः नोकरी करत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आणि लगेचच तासगाव लाकॉलेजमध्ये कामही मिळालं. मग वर्षभरातच तिला आष्ट्याच्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरी लागली.. एकिकडे संसार दुसरीकडे नोकरी असं करतानाच जबाबदारी आणखीनंच वाढली, कारण घरी पाळणा हलला, 1970 मध्ये श्रीपादचा जन्म झाला. आणि 1973 साली माधव. माझी मैत्रीण विदुला १९८२ साली जन्मली. ती माझी मैत्रीण कारण आम्ही तशा समवयस्कच.. पण विदुला अगदीच बाळ असताना तिची आई निवर्तली. मग माझ्या पुष्पा अत्यानेच तिचा सांभाळ केला. अगदी स्वतःच्या लेकीप्रमाणेच.. आज विदुला इंजिनिअर झाली आणि अमेरिकेत असते. अतिशय हुशार मुलीला त्याहून हुशार आणि कर्तबगार आई मिळाली. कसे जगावे याची शिकवण देणारी, कितीही दमली तरी सर्वांचे प्रेमाने करणारी आई.. हेवा वाटावा अशी आई!
आता श्रीपाद दादा textile engineer आहे sintex कंपनीत अहमदाबादला असतो. त्याची मुलगी सिद्धी US मध्ये एमएस झाली, आता पीएचडी करते आहे . तर माधव दादा Creative गारमेंट कंपनी भिवंडीमध्ये warehouse मॅनेजर आहे. माधव दादाचा मिहीर एमबीए finance दुसऱ्या वर्षात आहे . स्वतःच्या उमेदीवर उत्तम शिक्षण घेतलेल्या महिलेची वृक्षवल्ली उच्च शिक्षित नसेल तरच नवल!
एखाद्याचं करायचं म्हणून कौतुक मला कधी जमलंच नाही. पण जिथे कौतुकास्पद कामगिरी असते तिथे त्याबद्दल भाष्य झालंच पाहिजे असं मला वाटतं.. आणि म्हणूनच त्या नवदुर्गांपैकी एक असलेल्या माझ्या अत्याला नमन🙏
अशा स्त्रिया आपल्या आसपास असल्यानं जगण्याची कला समजते. जोखडात न अडकता, टिका टिप्पणीला भाव न देता, आणि स्वतःसोबत इतरांचं कल्याण करणाऱ्या अनेक महिलांचं वर्णन मी माझ्या पद्धतीने करत आहे. खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या..
ता.क.- सांगलीत राहूनही आत्याची भाषा शुद्ध. नाकोणता हेल ना रेकणे, शब्द लांबवणे, मुळीच नाही. हे विशेष!




Khupach sundar aani prerana denar lekh aahe.🙏
उत्तर द्याहटवा