माया, प्रेम आणि दैवी आशीर्वाद म्हणजे आजी

माझी आजी

 नवदुर्गेची नववी माळ 🙏😇

भावानं पळून जाऊन लग्न केलं. तसं करण्याचं खरं काहीच कारण नव्हतं, कारण मुलीला आई-वडिल भेटलेले, पण मुलीचे आई-वडील तिला विदेशी शिक्षणासाठी पाठवतील, आणि इकडे आपले आई-वडील त्यांच्या हिशोबानं मुली शोधत बसतील या भितीनं, त्यानं लग्न उरकलं, आणि तेंव्हा आईवडिल सांगली व भाऊ मावशीकडे पुण्यात राहात असल्याने, तिला तिच्या घरी सोडून मावशीच्या घरी आला. आणि मावशीची केसानं गळा कापल्यासारखी अवस्था झाली. कारण सांगलीत राहणारे आई-बाबा मावशीला दोषी ठरवणार अशी तिच्या मनात भिती. त्यातच ९२वर्षाची म्हातारी आजी, तिला केवढा धक्का बसेल, या भितीतच घडला प्रकार सांगितला आणि सगळं ऐकल्यावर अनपेक्षितपणे आजीनं हात पुढे केला व म्हणाली, "आणा पेढे!" क्षणार्धात घरातला सगळा ताणच निघून गेला... 'घर की मुखिया राजी, तो क्या करेगा काजी' अशी अवस्था झाली. सगळा ताण तिच्यामुळे निवळला. 

आज ती हवी होती, अनेक कठीण प्रसंगांना कसं सामोरं जायचं, हे मला स्वतःला अनेकदा उमगत नाही. त्यामुळेच आजी हवी होती, प्रकर्षानं हवीच होती. तिच्या हातात सगळं विश्व होतं. एक मायेचा हात फिरला की बास्स! 


तसा मी आजीवर सविस्तर लेख लिहिलाय, ती गेली तेंव्हाच २०१० साली. याच ब्लॉग स्पॉट मध्ये शेवटी तो दिसतो. 'माझी आजी' या नावाने.

 


१९१४सालचा तिचा जन्म पुण्यातला! नाव सुंदर दावलभक्त, त्याकाळातली ६वी शिकलेली, त्याही पुढे शिकली असती पण आजीच्या आईला समजलं की, लेकीला ५वीपासून इंग्रजी शिकवतायत, आणि अतिशय कट्टर इंग्रज विरोधी पणजीनं आजीला शाळेतनं काढलं. "माझ्या लेकीला मड्डम बनतात का हे" असं म्हणत आजीला शाळेला रामराम ठोकायला लावला. त्याकाळी लवकर लग्न होत. लग्न होऊन ती राधा बाई मुरलीधर अवचट झाली. केडगाव नावाच्या खेडेगावी येऊनही तिनं तिथे स्वतःचं विश्व निर्माण केलं.


 वय साधारण ९२-९३ असेल, पण मी निघाले की तिचा आवाज येई, "प्रज्ञा सगळं घेतलंस का? कालेजला ते सर्टिफिकट का काय द्यायचंय ते घेतलं का?" आणि मी नेमकं तेच विसरलेली असे. हा माझा एकटीचा नव्हे तर मावशी, माझा भाऊ, घरी राहाण्यासाठी आलेले इतर मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अशा सगळ्यांचाच अनुभव असे. तल्लख व कुशाग्र बुद्धिमत्ता ही तिला लाभलेली देणगी. सोबतच शांत, संयमी स्वभाव, कोणत्याही घटनेला सामोपचाराने अटोपते घेणे. वितंडवाद तर तिला माहितीच नाहीत. हे सगळं आठवलं की वाटतं, तिने हे सगळं आजच्या युगात सुद्धा सहजी केलं असतं. सगळ्यांना समजवण्याची धाटणी तिच्याकडे फार छान होती. पण जर कोणी नसेलच ऐकत, तर ती फक्त अबोला धरे. मग समोरच्यालाही त्याची चूक, बरोबर समजत असे. 



११ मुलं तिनी जन्माला घातली त्यातली ८ वाचली. (आम्हाला एक सांभाळता येईना😜) पण मुलांना चांगल्या संस्काराने घडवलं. माझा त्या भावंडांपैकी तिघिंशीच संबंध आला, मोठी प्रमिला मावशी, आई आणि धाकटी मिना मावशी. मोठ्या मावशीत आजीची माया उतरली होती, माझ्या आईत कष्ट आणि धाकट्या मावशीने तिची सेवाभावी वृत्ती घेतली. माझ्यात मात्र असा आजीचा कोणताच गुण नाही. मी मात्र समोरचा अगाऊ किंवा लबाड असेल तर  सडेतोड उत्तरं देणारी, ताडफाड बोलणारी, चूकांवर पांघरूणं न घालणारी,परीणामांचा फार विचार न करता निर्णय घेणारी अशीच होते व आहे. त्याचा मला फायदा जास्त झाला, कारण लोकांचे खरे रंग समजले. पण जिथे माणुसकी आहे, ममत्व आहे तिथे जिव ओवाळून टाकणारी आहे मी, बहुदा आजीचा असा एखादाच, पण मोलाचा गुण माझ्याकडे असावा.


आज आजी हयात नाही, पण तिच्या आठवणीनं जीव कासावीस होतो. तिच्या भेटीची तीव्र इच्छा मनात दाटून येते. आणि स्वप्नातून ती भेटते. तिची ती भेट सुखावते, पण फार वाटतं की मीही तिच्यासोबत का नाही गेले, भले ती ९६ वर्षांची होऊन गेली, तेंव्हा मी २५ वर्षांची होते पण तिच्यासोबतीनं तिच्या पायी तरी राहता आलं असतं. तिनं आपलंसं केलं तर जग जिंकण्याच्या पल्याडचा आनंद आहे. 

आज नवदुर्गा मालिका समाप्त करतेय. कारण आजी सारखी great बाई होणे नाही. नवदुर्गांच्या वर्णनात प्रत्येकीचे अनेक पैलू स्पर्शिलेसुद्धा गेले नाहीत. पण तरी प्रत्येकीचा रूबाब काही वेगळाच! हे देखिल सूज्ञ वाचकांनी ताडलंच. नवमी व विजयादशमी निमित्त आजीला साष्टांग दंडवत🙏

लिहिणे इथे थांबणार नाही, भेटूच नवनवीन विषयांसह...🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान