मेहनती व कर्तृत्ववान
माझी बॉस्स निखिला😊
नवदुर्गेची सहावी माळ 🙏😇
पहिल्या भेटीत मी अगं-तुगं करतच बोलले, आणि ५-६ वर्षे सिनिअर आहे समजल्यावर, जीभ चावतच मी म्हंटलं, मी काय अरे-तुरे करतेय, मॅडमच म्हणायला हवं, तशी ती खळाळून हसली आणि, "नको गं अरे-तुरेच कर" म्हणाली, शेजारीच सहकारी स्वानंद बसला होता, आम्ही आश्चर्यभरित नजरेनं पाहिलं आणि तिला म्हंटलंही की, हा तर तुझ्या मनाचा मोठेपणा! आणि आता अनेक ज्युनिअर्स मला अरे-तुरे करतात, ते मात्र तिला मुळीच आवडत नाही.😆 असो.
मी प्रेग्नंट असताना आम्ही कायम सोबतच जेवत असू, इतकंच काय पण कधीच आवडीने आइस्क्रीम न खाणाऱ्या मला अमूल किंवा हॅवमोअरचं आइस्क्रीम खाण्याचं वेडही तिनेच लावलं. आज मुलगा चांगलाच आइस्क्रीम प्रेमी झालाय, हे वेगळं सांगायला नकोच! काय करावं आणि काय नको, याचे उत्तम धडे ती सतत देतच असते. मुळात मोठी बहीण आणि आमच्या ऑफिसमध्येदेखील मोठीच जबाबदारी असल्याने सर्वाांना सांभाळून घेत पुढे जाणे ही तिची जुनी सवय. थेट विषयाचा तुकडा पाडणं तिला जमत असलं तरी ती ते टाळते. अनेकांना संधी देऊन पुढे आणण्याचं कसब तिला सहजी प्राप्त आहे. माझी व तिची tv9 मधली ११ वर्षांपासूनची ओळख. पण तिच्या वागण्यात, राहण्या-बोलण्यात तसूभरही फरक नाही. ती आहे तशीच आहे. मी तिला तिच्या नावाचा अर्थ विचारला तेंव्हा फुलांचा ताटवा असं सांगितलं, आणि खरच ती तिच्या नावाप्रमाणे, निखळ, आनंदी, उत्साही, स्वच्छंदीच आहे! ऑफिसमध्ये तिला अनेकजण वचकून असतात तर अनेकजण आदरयुक्त भितीनेच बोलतात, तर काही जण मॅडमचा मूड कसा आहे हे विचारूनच बोलायचं की नाही ते ठरवतात😆
खूप कमी वयात शहाणपण आलं की तशाच जबाबदाऱ्याही पडू लागतात. तसंच काहीसं तिचं झालं. घरातली सगळ्यात मोठी ती, एक लहान बहीण-भाऊ. वडिल शिक्षक आणि आई कर्तव्यदक्ष गृहिणी. वडिल शिक्षक असल्याने आणि वृत्तीने दिलदार असल्याने अनेक मुलं निखिला,विपुला, रितेश यांच्यासोबतच शिकली, मोठी झाली आणि चांगल्या ठिकाणी कामंधंद्यालाही लागली. या घरातली मुलं जे जेवणार खाणार तेच सगळं इतर मुलांनाही मिळत असे, त्यात कधीच भेदभाव झाला नाही. शिक्षकच ते, जसे शिकवताना भेदभाव नाही तसाच राहाण्या-खाण्यातही मुलांना कधीच तोशीस पडणार नाही याची काळजी घेत. पोरं आपली घरं सोडून आली आहेत हे जाणून ती आई सुद्धा सर्वांचंच अगदी मायेनं करत असे. जसे निखिला-विपुला-रितेश माझे तशीच ही सुद्धा माझ्या मुलांप्रमाणेच, इतका सरळ पण देखणा विचार होता पाटील दाम्पत्याचा! त्याच मुशीत वाढल्यानं निखिलाचा हात देखिल प्रचंड सढळ. हातचं राखून, असं काही माहितीच नाही तिला.
निखिला मूळची पालघरची. प्रथमिक शिक्षण तिथेच झालं. वय १२-१३चं पण मुंबईत शिकायचं, अत्याकडे राहायचं ही ओढ असल्यानं, अखेर ती इच्छा पूर्ण झाली. आणि BSc मुंबईतून करायचं ठरलं आणि निखिला शिक्षणासाठी सुखासीन घरातून बाहेर पडली. अत्या म्हणजे आपलीच पण तरी लोकाचं घर, याची जाणीव तिला होतीच. त्या जाणिवेतूनच ती राहिली. आधी शेअरमार्केटसाठी काम केलं. पण धडाधड कोसळणाऱ्या शेअर्सने भागिदारांची होणारी अवस्था पाहून त्या क्षेत्राला रामरामच ठोकला. कारण तिच्या संवेदनशील मनाला ते पाहावलं नाही. पण नियतीनॆ पुढे सुंदर ताट वाढून ठेवलंच होतं. पत्रकारीतेचं शिक्षणही तिने घेतलं आणि वडलांकडूनही बाळकडू आल्यानं पत्रकारितेची धग तिच्यात होतीच. अल्फा मराठीत तिच्या कामाची सुरुवात झाली.
मा. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार!निखिला पाटीलची ती निखिला शेखर म्हात्रे झाली. नवऱ्याची म्हणजे शेखररावांची तिच्या कामाला खंबीर साथ मिळाली आणि मग तिने मागे वळून पाहिलंच नाही. झी, सहारा समय मध्ये हिंदी-मराठीतून वृत्तांकन, मग टीव्ही9, जय महाराष्ट्र व परत तिला २०११ला टिव्ही9चं बोलावणं आलं. आणि मोठ्याच पदावर ती रुजू झाली. तिचं मराठी-हिंदीवरचं प्रभुत्व अनेकांनी अनुभवलंय. अनेक चर्चासत्रं तिनं गाजवली. बड्याबड्या नेत्यांना तिनं बोलतंही केलंय आणि बोलती बंदही केलीय.😅 राजकारणातले बारकावे अचूक हेरणे हे कसब तिच्यापाशी आहे. आजच्या घडीला मराठीत महिला व पुरुष अँकर्समध्ये परखड व्यक्तिमत्व अशी तिची ओळख आहे.
आज तिचा मुलगा कॉलेजमध्ये आहे हे अनेकांना पटतच नाही. त्यामुळे ती टीव्ही9मधली संतुर ममा आहे!☺
पहाटे ६ला उठून आधी योग साधना मग मुलासाठी डबा, न्याहारी, नवऱ्यासाठी न्याहारी-जेवणाचा डबा, स्वतःसाठीचं जेवण करून तासा-दीड तासाचा प्रवास करून ती ऑफिसला १०.३० लाच पोहोचते. रात्री ८ पर्यंत तिचा स्टॅमिना कायम असतो. इतकंच काय एखाद्या महत्त्वाच्या दिवशी, उदा. निकाल, मोठी सुनावणी, मोठे मोर्चे, राजकीय नेते दौरे इ.इ. असल्यास ती सकाळी ७ला ऑफिसमध्ये पोहोचते आणि मग रात्रीचे ११ वाजले तरी तिला थकवा किंवा गाळपटलेला चेहरा तुम्हाला कधीच दिसणार नाही. सतत बोलणं हे वैशिष्ट्य नसून, माहितीपूर्ण आणि बारकावे, कंगोरे उलगडत बोलणं हे तिचं कौशल्य.
घर व करिअरचा सुंदर मिलाफ साधून तिने अनेकांसमोर आदर्श उभे केलेत.तिच्यातला उत्साह खरच वाखाणण्याजोगा. अनेक राजकारणी आदबीनंच संवाद साधतात कारण व्यक्तिमत्व किती परखड हे त्यांनाही अवगत आहेच. अशा या सदाबहार आणि पत्रकारिता क्षेत्रातल्या नवदुर्गेला सहावी माळ समर्पित!
एखाद्याचं करायचं म्हणून कौतुक मला कधी जमलंच नाही. पण जिथे कौतुकास्पद कामगिरी असते तिथे त्याबद्दल भाष्य झालंच पाहिजे असं मला वाटतं.. आणि म्हणूनच त्या नवदुर्गांपैकी एक असलेल्या निखिलाला माझा प्रणाम🙏
अशा स्त्रिया आपल्या आसपास असल्यानं जगण्याची कला समजते. जोखडात न अडकता, टिका टिप्पणीला भाव न देता, आणि स्वतःसोबत इतरांचं कल्याण करणाऱ्या अनेक महिलांचं वर्णन मी माझ्या पद्धतीने करत आहे. खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या..








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा