कर्तृत्ववान मातृभक्त
माझी मावशी
नवदुर्गेची तिसरी माळ 😇🙏
मावशीच्याच सांगण्यानुसार नारद मंदिरात कीर्तनाचे वासंतिक वर्ग केल्यानंतर ह.भ.प. आफळे बुवांकडे कीर्तन, गायनाचे शिक्षण सुरू होते, आणि थेट गुजरातच्या अहमदाबादेत कीर्तन ठरलं. मी पुण्यात मीना मावशीकडे राहात होते, त्यामुळे आधी तिची परवानगी मग आईची, मी विचारताक्षणी मावशीने लगेच होकार देऊन, माझ्यासाठी बॅगही काढली. मला प्रचंड आनंद झाला.. कारण आईकडून ही परवानगी मिळण्यापूर्वी १०० प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं, त्यापेक्षा तोफेच्या समोर जाणं सोप्पं😅 असो, विनोदाचा भाग सोडला तरी, मीना मावशी BSNL ची नोकरी सांभाळून आणि घरी वयस्कर आई जिला साधं मोरीपर्यंत जायलाही माणूस लागत असे, तिला सांभाळून, मी व माझा बिलंदर भाऊ सांभाळून सुद्धा ती माझ्या प्रगती होईल असे वाटणाऱ्या कोणत्याच मार्गात अडवी आली नाही. उलट तिने कायम साथच दिली. तिच माझ्यासाठी मोलाची ठरली.
मीनाक्षी अवचट, प्रवचन करताना!
मला खेळायची प्रचंड आवड आणि ठिकठिकाणी जाण्याची अवेकदा संधी मिळत असे, पण खरी संधी मिळाली ती पुण्यात मावशीमुळे..सांगलीतल्या सांगलीत खोखो व्यतिरिक्तकोणता खेळ खेळले नाही. पण पुण्यात सगळंच विस्तारलं, FY B.com ला असताना कॉलेजमधून नेटबॉल, सॉफ्ट बॉल आणि क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आणि दौंड, राजगुरू नगर, नारायणगाव, ते अहमदनगर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गेले, ती केवळ मावशीमुळेच. माझ्यामनाप्रमाणे काही करायचंय आणि त्याला होकार दिला तर तो फक्त आणि फक्त मीना मावशीनेच.
माय मरो मावशी उरो, अशी आपली म्हण आहे. माय जिवंत असतानाच मावशी आपल्याला भाच्यांना माय म्हणजे आई प्रमाणे कशी सेवा देते याचा अनुभव मी पुण्यात मावशीकडे राहून घेतलाय.
पण असं वाटेल की मावशी काय सगऴ्याच भाच्यांचं करते, मात्र BSNL ची आठ तासाची नोकरी, ९०वर्षाची आई, आम्ही दोन भावंडं, आमचे कॉलेज, कीर्तन, क्लासेस हे सगळं व्यवस्थित पाहून सुद्धा मावशीने आमच्यासकट तिच्याकडे मदतीसाठी आलेल्या कोणालाच कधीच अव्हेरलं नाही. अगदी सांगलीतल्या आमच्या घरमालकीण, ज्यांचा सांगलीत स्वतःचा मोठा वाडा आहे त्या वाळूंजकर काकू देखिल वकिलीच्या कामासाठी आल्या असता , तिच्याकडे राहून पाहूणचार घेऊन गेल्यात. माझी चुलत बहीण तेजू ताई, माझी सांगलीची मैत्रीण इंद्राणी पुराणिक, अत्येबहीण विदुला, भावाचे तर असंख्य मित्र तिच्याकडे राहून गेलेत. आणि अगदी अलिकडेच माझी नणंद सुद्धा तिच्याघरी वर्षभर राहिली.
खरंतर १० बाळंतपणं झाल्यानं वैतागलेल्या आजीला आता हे बाळ नको असं वाटत होतं. पण केडगावच्या मिशनहॉस्पिटलने त्याला सपशेल नकार दिला आणि इतिहास घडला. आजही पंडिता रमाबाई यांच्या कार्याची दखल घेताना केडगावच्या मिशनरी हॉस्पिटलच्या पहिल्या बाळंतिणीचा उल्लेख होतो, सौ. राधाबाई अवचट यांचं मूल इथे प्रथम जन्मलं, पण ११वं मूल नको झालं पण तरीही ते शेवटचं मूल जन्मलं आणि ती माझी मावशी मीनाक्षी अवचट. पूर्वी सगळी बाळंतपणं घरीच होत असत, साधारण ६५वर्षांपूर्वी मावशीचा जन्म तिच्या आईच्या मनाविरोधातच झाला आणि तीच ९७ वर्षापर्यंत ती तिची तारणहार ठरली.
८ भावंडातील ती शेंडेफळ. ४ भाऊ ४बहिणींत ती सर्वांची लाडकी, कुरळ्या केसाची, गोरीपान, गोबरेगोबरे गालाची, छोटेछोटे फ्रॉक, घरातली चालती बोलती बीहुलीच जणू. त्यामुळे बालपण अतिशय आनंदात गेलं.एकदा शेतातला माल घेऊन वडिल म्हणजे अप्पा स्टेशनलाबै लगाडीवर निघालेले असताना ही पण हट्टाला पेटली, पण एवड्याशा पोरीला कुठे न्यायचं म्हणून त्यांनी ते टाळलं. पण ही एवढीशी पोर त्या बैलगाडी समोर उभी राहिली आणि, "असला कसला बाप" असं म्हणून पळून आली. 😆
केडगावात ४-५ कि.मी. लांब जाऊन ७वी पर्यंत शिकली मग पुढच्या शिक्षणानिमित्त ती पुण्यात आली काही भावंडांसोबत तिचेही ८वीपासून शिक्षण सुरू झाले. भावंडांची लग्नं तोवर झालेली होती मग मोटी बहीण सुमती (माझी आई) सोहत पार्ट टाईम जॉब करत, पैसे कमवत शिक्षण पूर्ण केले.त्यावेळचे मेट्रिक पूर्ण करून SP collegeमधून SY Bsc पर्यंत शिक्षण घेतलं, मग आजारी पडल्याने गॅप पडला, पण तिने शाखा बदलून ग्रॅज्यूशन पूर्ण केले. त्यानंतर भाऊ BSNL मध्ये नोकरीस होता. मात्र कोणताही वशिला न नापरता BSNL मध्ये तिच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर तिला नोकरी मिळाली. आणि तिने अनेक मुलं पाहूनही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तसंतर वडिल अप्पा हे तिला, "मीना माझा पाचवा मुलगाच आहे" असं म्हणत असत. त्यांच्या शब्दांप्रमाणे ती खरंच मुलाप्रमाणे स्वावलंबी आणि कर्तृत्ववान ठरली. आणि तिचं कर्तृत्वाचे काही गुण माझ्यातही थोडेफार झिरपले. तिच्या मेहनतीतल्या काहीवर्षांची मी प्रत्यक्ष साक्षिदार आहे. कारण मी जवळपास FY ते MAच्या पहिल्या वर्षापर्यंत तिच्याकडे राहिले आहे. अशा कर्तृत्वावान स्त्रियांनी आम्हाला घडवलं हे आमचं केवढं मोठं भाग्य. तिचे उपकार न फिटणारेच!
तिला २०१६मध्ये ब्रेस्ट कँसरचाही सामना करावा लागला. त्यावरही तिने यशस्वीरित्या मात केली आणि आता ती पूर्ण बरीही झाली, हिंडूफिरू लागली. तिने अनेक त्रास सहन केले, त्यापैकी तो सर्वात मोठा आणि भितीदायक त्रास. पण सद्गुरू कृपेने तारले.🙏
ता.क.- इतके ओळखीचे वा अनोळखी लोक आले तरी ती त्यांचं हसतमुखाने करत असे, त्यापेक्षा जास्त आनंदाने आईचे करत असे
हे सर्व ती सद्गुरू कृपेमुळेच करू शकली हा दाखिल ठाम विश्वास
अशा स्त्रिया आपल्या आसपास असल्यानं जगण्याची कला समजते. जोखडात न अडकता, टिका टिप्पणीला भाव न देता, आणि स्वतःसोबत इतरांचं कल्याण करणाऱ्या अनेक महिलांचं वर्णन मी माझ्या पद्धतीने करत आहे. खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या..





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा