आदर्श शिक्षिका आणि गृहिणी

 रजनी वहिनी 

नवदुर्गेची दुसरी माळ🙏😇

आम्ही ६ जणं खेऴत बसलो होतो, रजनी काकू तिथे आल्या आणि आम्हाला म्हणाल्या, "पोरांनो आता इथं सगळे पंगतीला बसणारेत, तुम्ही खेळ उचलून आत जा" रजनी काकू शिक्षिका, त्यामुळे मुलांना हाताळण्याची हातोटी उत्तमच होती. आम्ही लगेच उठून आत खेळत बसलो..

काकूंनी तो आयाताकार लांब खोलीचा भाग स्वच्छ झाडून मग पुसून घेतला. आणि मग हळू हळू अंबंटगोड वास, खरपूस भाजलेल्या पोळ्यांचा आणि भाताचा वास नाकावाटे आत शिरून भुकेची चाहूल देऊ लागला.. मी धावतच स्वयपाक घरात पोहोचले, तिथे तीन अज्ज्या आणि माझी सख्खी अत्या व रजनी काकू जुंपल्याच होत्या. एक अज्जी कोथिंबीर निवडतेय, एक लसूण सोलतेय, एक अज्जी खलबत्त्यात काहीतरी कुटतेय, एका स्टोव्हवर मोठ्या पातेल्यात आमटी खळाखळ उकळत होती आणि रजनी काकू फटाफट पोळ्या लाटत होत्या, अत्या भाजत होती.. पोळ्यांची चवडच ती रचत होती. जयसिंगपूरच्या कुलकर्ण्यांच्या घरचं हे चित्र काही आजचं नव्हतं, तर इथे रोजच असं जेवण बनायचं. आणि पंगतीच जेवायला बसायच्या. त्याअन्नाला अक्षरशः प्रसादाची चल असायची. का, ते माहित नाही पण सर्व दुर्गा तिथे रांधायच्या.. 

आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष १९७० ते ९० पर्यंत असंच वातावरण पूर्ण भारतातल्या एकत्र कुटुंबात दिसत असे. पण खरी मेख पुढे आहे. 


रजनी काकू, या मूळ बहादूरवाडी गावच्या, माहेरचे नाव  मंदाकिनी गोपाळ जोशी. शिक्षण बहादूरवाडी हायस्कूलमधून झालं. त्या काळातील ते साजेसं शिक्षण! म्हणजे एस एस सी मग डी एड केलं. लग्न होऊन त्या जयसिंगपुरला आल्या आणि रजनी मोहन कुलकर्णी झाल्या. मोहन कुलकर्णी हे समाजप्रेमी व्यक्तित्व, त्यामुळे घरी विविध क्षेत्रातील लोकांची सतत उठ-बस. एकत्र कुटुंब असल्यानं घर मोठं, घरातली मंडळीच १० जणं..पण लग्न झाल्यावर घर, समाज सांभाळूनही काकूंनी ३७ वर्ष नोकरी केली..१९७० ते २००७ त्या अविरत कार्यरत होत्या.

त्यांनी शिक्षिका असूनही तसा कधी आविर्भाव दाखवला नाही.त्यामुळेच त्या मलााही गृहिणीच वाटत. कारण १९९०च्या काळात ८०टक्के महिला गृहिणीच असत. पण रजनी काकू प्राथमिक शाळेच्या शिक्षिका. ७० च्या दशकात घरातलेच १० जणांचं सगळं सांभाळून, नोकरी करत, इतकंच नाही, तर आले-गेलेल्यांचं जेवण-चहा-नाष्टाही त्या न थकता करत असत.

 


मी जेंव्हा जयसिंगपूरला जात असे, तेंव्हा रविवारच असे, त्यामुळे जेंव्हा काकूंना घरी पाहिलं तेंव्हा, त्या पदर आणि एका बाजूची साडी खोचलेली, पाणी उपसून काढतायत, धुणी हातावेगळी करतायत, स्वयपाकात झोकून देऊन काम करतायत, वाढायला पुढे, पुन्हा भांडी घासायलाही बसल्यात.. पण नंतल मला उलगडी झाला की, ही महिला गृहिणी नाही. हे सगळं करण्यापूर्वी ती बाई ८ तास एका शाळेचा वर्ग शिकवून घरी आलेली असायची. पण काकूंच्या चेहेऱ्यावर कधी थकवाही दिसला नाही की कधी कशाला आता हे लोक आले, अशी अठी पडलेलीही पाहिलेली नाही.


आदर्श महिला म्हणत त्यांचा यथोचित पुरस्काराने गौरवण्यात आलंय!


तसंच कोल्हापुरकरांनीही त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत केलंय.

सांगलीत असताना फक्त दोनच ठिकाणी जायला भयंकर आवडायचं. एक विश्रामबागला जिथे आमचे अण्णाकाका राहात, दुसरे जयसिंगपूर. त्यामागचं महत्त्वाचं कारण तिथला पोरवडा, त्यामुळे भरपूर खेळा आणि खाण्या-पिण्याची कोणतीच बंधनं नाहीत. त्यामागे मुख्य कारण म्हणजे विश्रामबागला राहात असलेल्या माझ्या अण्णाकाकांचा- शोभाकाकूचा स्वभाव आणि जयसिंगपूरला पुष्पा अत्याचं सारे कुटुंबीय, जे अतिशय प्रेमळ आणि निरपेक्ष भावनेनं आल्या-गेलेल्यांचं स्वागत करत असत.. 

आज मोठा मुलगा उदय जयसिंगपुरातील प्रथितयश वकील आहे, पत्नी जोत्सनासुद्धा साजेशी जोडीदार आहे. तर धाकटा पुत्र किरण प्रोफेसर आहे. त्या दोघांची मुलं पुण्यात इजिनिअर झाली आहेत. असा त्यांचा वृक्षवेलही समृद्ध आहे..


रजनी काकूंची उमेद घेण्यासारखी,  कामाचा कितीही राडा असो कधी हूं नाही की चूं नाही.. न थकता सर्वांचं प्रेमानं करण्याची त्यांची वृत्ती मला फार भावली. करायचं म्हणून केलेलं हे कौतुक नाही. ही त्यांच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड तर नाही म्हणणार, पण माझ्या कुवतीप्रमाणे घेतलेली दखल आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान