धन्वंतरीच्या आशीर्वादाने पावन

उर्मिला ताई
नवदुर्गेची सातवी माळ 🙏😇 


मी साम वाहिनीवर 'शाब्बास' हा लहान मुलांसाठीचा कार्यक्रम करत असताना, मी शोधून शोधून काहीतरी अवली, हटके करणारी मुलं शोधून काढत असे. आणि त्या कार्यक्रमाचं अँकरिंगही तसाच हटके मुलगा करत असे. वरूण त्याचं नाव. दर रविवारी शूट असे आणि किमान ४ वेगवेगळ्या 
क्षेत्रातली मुलं येत असत. या रविवारी अडीच वर्षाची जुळी मुलं आली होती, ते दोघे जो झेंडा दाखवू त्या देशाचं नाव सांगत असत. १५ ऑगस्ट निमित्त त्या लहानग्यांचा इंटर्व्ह्यू घ्यायची जबाबदारी १२ वर्षाच्या वरूणवर होती.😆 आता अडीच वर्षाची मुलं म्हणजे अगदीच बाळं, तरी त्यांना छान बिनबॅगनध्ये बसवलेलं.. ५-५  झेंडे दाखवून झाल्यावर मी त्यांना प्रश्न विचारायला सांगे. पण सेटवर खूप सारी खेळणी, बॉल आणि रंगीबेरंगी आकर्षक असं बरंच काही होतं, त्यामुळे हा आमचा छोटा अँकर, आSsss करून प्रश्न विचारू लागला की ती मुलं खाली वाकून बॉल उचल, किंवा जोरजोरात ओरडून यल्लो-यल्लो असे काहीतरी चाळे करत होते. वरूण वैतागून, "हम ते जाऊदे , मला सांग.." असं म्हणेपर्यंत एकजण उठून दोन बॉल घेऊन यायचा. मग दुसऱ्या मुलाला प्रश्न सुरू केला की ते आपापसातच बोबडं काहीतरी बोलू लागत. वरूणची त्यावेळी दैनावस्था झालेली आम्हाला स्पष्ट दिसे आणि सगळे हसू लागत. नेहेमी वरूणसोबत बाबा येत पण यावेळी आई आली होती आणि वरुणची आई माझ्या सोबत PCR मध्ये म्हणजे जिथे स्विचिंग, रेकॉर्डिंगचं काम सुरू होतं, तिथूनच सगळं पाहात होती. आणि "कित्ती गोड मुलं आहेत, आज वरूणचा चांगला किस पाडणार" असं म्हणून हसत होती. 
तीन वर्षाच्या निहार गितेने 'शाब्बास'मध्ये वरूणचं चित्र काढलं होतं!

 माझी आणि वैद्य उर्मिला पिटकर यांची तिथेच ओळख झाली. अतिशय साधी राहणी, एक वेणी, सुती पंजाबी ड्रेस, कपाळावर गोल टिकली, बोलण्यात एकप्रकारची मार्दवता, विनम्रता आणि समोरच्याला कायम आदर देऊन बोलण्याची पद्धत. त्यामुळे मी त्यांची खरी ख्याती जाणून नव्हते.. आणि त्यावेळी मला मुळीच कल्पनाही नव्हती की या एमडी आयुर्वेद, कँसर आणि आयुर्वेद विषयात  पीएचडी, आणि योग प्रशिक्षकही आहेत! मुळच्या दादरमध्ये राहणाऱ्या उर्मिला श्रीकृष्ण बेडेकर या शारदाश्रम शाळेच्या विद्यार्थिनी. त्यानंतर  रुपारेलमधून १२वी, मग सायन आयुर्वेद महाविद्यालयातून बी ए एम एस पदवी मिळवली. मग गुजरातच्या  आयुर्वेद विश्वविद्यालयातून MD करून सुवर्ण पदक विजेती हा बहुमानही पटकावला. त्यानंतर वरळीच्या पोतदार आयुर्वेद महाविद्यालायतून कँसर आणि आयुर्वेद या विषयात PhDपूर्ण केली. लग्न होऊन त्या ग्रँटरोडला आल्या आणि उर्मिला अतुल पिटकर झाल्या. घरूनही त्यांचं क्लिनिक सुरू करणं असेल किंवा विविध शहरात भेटी घेणं असेल, अतुल पिटकरांची त्यांना उत्तम साथ लाभत असे. तसेच समंजस सासू-सासरे त्यांना लाभले. 



मुळात सामान्यांना सोप्या भाषेत आयुर्वेद सांगणं ही त्यांची हातोटी. गेल्या २३ वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्या पंचकर्म, आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यावर आयुर्वेद व्यासपीठ या देशव्यापी सेवाभावी संघटनेची केंद्रीय सहकार्यवाह म्हणून जबाबदारी आहे.

2015 साली सांडू फार्माच्या धन्वंतरी पुरस्काराने त्यांना सम्मानित करण्यात आलं आहे.



  तर 2019 मधे खाडीवाले वैद्यक संस्था यांच्यावतीने  अनुसंधान क्षेत्रातील योगदानासाठीही पुरस्कार मिळाला आहे. ओळख पंचकर्माची हे त्यांचं पुस्तक प्रचलित आहे. तसंच बीएएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी #BAMSनंतरचं करिअर या पुस्तकाचं संपादन केलंय. सर्वसामान्य नागरिकांसाठी  आयुर्वेदिक जीवनशैली कार्यशाळा त्या घेत असतात. 



आयुर्वेद ही भारताची आन बान शान! पण त्याचा विसर सर्वसामान्यांना पडलाय. त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने आयुर्वेदाचे अनेक उपासक झटून काम करतायत. त्यातीलच उर्मिला ताई या धन्वंतरी देवतेच्या सच्चा उपासक त्यांच्या कार्याला यश देओ ही दुर्गा देवी चरणी प्रार्थना.
 माझी व त्यांची इतकी जुनी ओळख असूनही, व्यवसायिक दृष्ट्या फायदा मिळावा या हेतूने त्यांनी कधीच माझ्याशी संवाद साधला नाही. उलट मीच त्यांना अनेकदा कॉल करून फोनवरूनच त्यांच्याकडून उपाय करवून घेतले आहेत.☺
त्यांचं हे वर्तन कार्यमग्न आणि स्वतःच्या कार्यावर विश्वास असणाऱ्या, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असणाऱ्या कर्मयोगिनीचंच दर्शन घडवते🙏

अशा स्त्रिया आपल्या आसपास असल्यानं जगण्याची कला समजते. जोखडात न अडकता, टिका टिप्पणीला भाव न देता, आणि स्वतःसोबत इतरांचं कल्याण करणाऱ्या अनेक महिलांचं वर्णन मी माझ्या पद्धतीने करत आहे. खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान