सिद्ध माता व गणितज्ञ

देशपांडे काकू

नवदुर्गेची आठवी माळ🙏😇



कॉलेजला असताना, देशपांडे काकांच्या नारायण पेठेतल्या घरी जाण्याचा योग अनेकदा आला. कारण तिथे ध्यानाला बसायला छान वाटे. बाहेरच्या खोलीत काका डोक्यावर हात ठेवत आणि मी ध्यान लावण्याचा प्रयत्न करत असे. आणि आतल्याच खोलीत देशपांडे काकू विविध वयोगटातल्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत असत. १-२ वर्षात मी ८-१० वेळा गेले असेन. पण काकूंना ही प्रशांतची बहीण इतकीच माहिती होती. जेंव्हा त्यांना समजलं की मी लग्न करणार नाही, त्यांनी धोसराच लावला, "प्रज्ञा असं होऊच शकत नाही." मी त्यांच्याकडे पाहातच राहिले, कारण गणित शिकवणाऱ्या बाई जर असं भाकित करत असतील तर ते खरच भाकीत की त्यामागे काही गणित असावं? या बुचकळ्यात असतानाच त्या बोलून गेल्या, "मी सांगते तू लग्न करणार आणि काकांना आणि मला पेढे द्यायला येणार!" मी ते सगळंच हसण्यावारी नेलं. पण काकूंनी खरंचच बसल्याजागी काहीतरी गणित मांडलं आणि पुढच्या दोनच वर्षात २०१६साली मी लग्न केलं, तेपण अगदी थाटामाटात! काका-काकूंचे आशीर्वादही लाभले हे मोठं भाग्यच!😇

देशपांडे काका सिद्धपुरूषच, पण त्यांची अर्धांगिनी सुद्धा सिद्धमाताच ! त्या तशा मुळात अबोल, पण समोरचे लोक त्यांना बोलण्यास पात्र वाटले, तरच तुमच्यावरही कृपा झाली असे समजावे😇 काकांकडे रोज उठता-बसता अनेक लोकांची रीघ लागे. मी, माझा भाऊ, त्याची मित्रमंडळी तेंव्हा महाविद्यालयातून शिकत असल्याने आम्ही ध्यान करून निघून जायचो. पण अनेक समस्या घेऊन लोक आलेले पाहून, जगात लोकांसमोर किती समस्या आहेत, असे वाटे. आता आम्हालाही थोड्याफार प्रमाणात नियतीने त्या गर्तेत आणलेच. पणतरीही आम्हाला देशपांडे काका आणि बरोबरीने काकूंचेही मार्गदर्शन मिळत असल्याने प्रश्नांचे समाधान होते. काकांच्या घरून निघताना बॅचलर काळात जे समाधान असे, त्याहीपेक्षा जास्त समाधान आता वाटू लागले. याचे मुख्य कारण काकू शाळेतून निवृत्त झाल्यामुळे आता त्याही भेटतात. 


काकुंचे माहेरचे नाव संध्या शांताराम भालेराव. सोमवार पेठेतलं त्यांचं माहेर आणि १९६९ पासून अध्यापक कॉलनी सहकार नगरमधे राहात असत. वडील पाठबंधारे विभागात कार्यरत होते तर आई बालवाडी शिक्षिका.  त्यांना दोन बहीणी व एक भाऊ, त्या सर्वात मोठ्या. सगळेच उत्तम शिकले. आई शिक्षिका असल्यानेच शिक्षण देण्याचं बाळकडू मनात रुजलं होतं जणू. त्यामुळेच B.SC. mathematics, B.Ed. करून त्यांनी शिक्षिकेची नोकरी सुरू केली. लग्नानंतर त्या झाल्या सौ. संध्या वासुदेव देशपांडे! माहेर- सासरही सुशिक्षित असल्यानं नोकरी करत घर सांभाळणे हे शक्य झाले. शाळेत शिक्षिका असल्याने अनेक मोठे कार्यक्रम व घरातले सणवार सांभाळत त्यांनी दोन्ही कर्तव्य चोख पार पाडली. मुळात आवडीचा विषयच गणित असल्याने, घर-शाळा यांचं गणित त्यांनी उत्तम मांडलं. कुणाला काही कमी पडू नये , मग ते अन्न असो की शिक्षण, सगळंच पोटभर देणारा त्यांचा हात होता. 



काकांची साथ तर लाखमोलाचीच. पण त्यांना चांगला स्टाफ म्हणजे काम करणारावर्गही चांगला लाभला. अगरकर हायस्कूलमधून सेवानिवृत्ती  घेताना त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. शाळेत त्यांच्याबद्दलचा आदर आणि दरारा काही वेगळाच असे. त्यांची शिकवण्याची हातोटी अशी की, लक्षात राहायलाच हवं. शिक्षणाची गोडी नसणाऱ्या अनेक मुलींना त्यांच्यामुळे शिक्षणाची आवड निर्माण झाली.


एक आदर्श शिक्षिका, आदर्श माता आणि आदर्श पत्नी अशी त्यांची ओळख! शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हंटल्यावर करडा आवाज, भेदक नजर, या सगळ्याला काकू पूर्णपणे अपवाद आहेत.  काकूंच्या वागण्या बोलण्यात इतकी मृदूता, मार्दव आहे आणि त्यामुळेच की काय मातृत्व त्यांच्यात साठून आहे. आणि त्यांना उत्तम विद्यार्थी, दर्जेदार शिष्यांच्या माध्यमातून मायेची व जोडीनं अभ्यासाची पखरणही करता आली, असंही वाटतं. त्यांची  लेक मधुरा डॉक्टर आहे. तर धाकटा मुलगा दिनेश इंग्लंडमध्ये मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे, तो देखिल गणिताच्या जोरावरच. 

अंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये सहभाग





अशा स्त्रिया आपल्या आसपास असल्यानं जगण्याची कला समजते. जोखडात न अडकता, टिका टिप्पणीला भाव न देता, आणि स्वतःसोबत इतरांचं कल्याण करणाऱ्या अनेक महिलांचं वर्णन मी माझ्या पद्धतीने करत आहे. खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या..

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान