पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सण मोठा पण...

इमेज
विजया दशमी! कोणताही सण म्हंटलं की घरी खूप लगबग असायची. तसे घरी राहणारे आम्ही चौघेच. मी-भाऊ व आई-बाबा. पण आईला सणावारांची भारीच हौस. साफसफाई, मग देवी-देवतांच्या पितळी मूर्ती स्वच्छ करणे. मग सेवळ्यात स्वयंपाक, आणि नैवेद्य होईस्तो कुणी काहीच खायचं नाही😥. काकडी चोचणे. खोब्र खोवणे अशी शेल्की कामं मला दिली जात, पण कितीही भूक लागली तरी खाईन तर शप्पथ! एकदा सांगितलं नाही म्हणजे नाही. मग कधी एकदा नैवेद्य होतोय आणि आपण जेवतोय अशी अवस्था होई. जीव अगदीच मेटाकुटीला येई. पण सणांची पूर्वीची मजा काही औरच.. पाटीपूजन, पाटीवर सरस्वती काढून न्यायची. तिची पूजा करून बुद्धी दात्रीला नमन करायचं. घरातील अस्त्र, शस्त्रांचं पूजन.. झेंडूचे हार-तोरणं सगऴं घरीच बनत  असे. शिवाय सिमोल्लंघन म्हणजे किमान नव्या संकल्पांची मांडणी करावी लागत असे.  आता नुसत्या नटमोगऱ्या-मोगरे बनून फिरणारे पाहिले की पूर्वीची शान आठवते. कारण पूर्वी सणालाच नवे कपडे मिळत. त्यामुळे त्या कपड्यांना घातल्यावरचा रुबाब काही वेगळाच असे. आता काय, आम्ही उठ सूट कपडे घेतो, कधीही घालतो. आणि मग ऐन सणालाच घ्यायचं राहून जातं.   सणाची खरी ग...

माया, प्रेम आणि दैवी आशीर्वाद म्हणजे आजी

इमेज
माझी आजी  नवदुर्गेची नववी माळ 🙏😇 भावानं पळून जाऊन लग्न केलं. तसं करण्याचं खरं काहीच कारण नव्हतं, कारण मुलीला आई-वडिल भेटलेले, पण मुलीचे आई-वडील तिला विदेशी शिक्षणासाठी पाठवतील, आणि इकडे आपले आई-वडील त्यांच्या हिशोबानं मुली शोधत बसतील या भितीनं, त्यानं लग्न उरकलं, आणि तेंव्हा आईवडिल सांगली व भाऊ मावशीकडे पुण्यात राहात असल्याने, तिला तिच्या घरी सोडून मावशीच्या घरी आला. आणि मावशीची केसानं गळा कापल्यासारखी अवस्था झाली. कारण सांगलीत राहणारे आई-बाबा मावशीला दोषी ठरवणार अशी तिच्या मनात भिती. त्यातच ९२वर्षाची म्हातारी आजी, तिला केवढा धक्का बसेल, या भितीतच घडला प्रकार सांगितला आणि सगळं ऐकल्यावर अनपेक्षितपणे आजीनं हात पुढे केला व म्हणाली, "आणा पेढे!" क्षणार्धात घरातला सगळा ताणच निघून गेला... 'घर की मुखिया राजी, तो क्या करेगा काजी' अशी अवस्था झाली. सगळा ताण तिच्यामुळे निवळला.  आज ती हवी होती, अनेक कठीण प्रसंगांना कसं सामोरं जायचं, हे मला स्वतःला अनेकदा उमगत नाही. त्यामुळेच आजी हवी होती, प्रकर्षानं हवीच होती. तिच्या हातात सगळं विश्व होतं. एक मायेचा हात फिरला की बास्स!  तसा मी आ...

सिद्ध माता व गणितज्ञ

इमेज
देशपांडे काकू नवदुर्गेची आठवी माळ🙏😇 कॉलेजला असताना, देशपांडे काकांच्या नारायण पेठेतल्या घरी जाण्याचा योग अनेकदा आला. कारण तिथे ध्यानाला बसायला छान वाटे. बाहेरच्या खोलीत काका डोक्यावर हात ठेवत आणि मी ध्यान लावण्याचा प्रयत्न करत असे. आणि आतल्याच खोलीत देशपांडे काकू विविध वयोगटातल्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत असत. १-२ वर्षात मी ८-१० वेळा गेले असेन. पण काकूंना ही प्रशांतची बहीण इतकीच माहिती होती. जेंव्हा त्यांना समजलं की मी लग्न करणार नाही, त्यांनी धोसराच लावला, "प्रज्ञा असं होऊच शकत नाही." मी त्यांच्याकडे पाहातच राहिले, कारण गणित शिकवणाऱ्या बाई जर असं भाकित करत असतील तर ते खरच भाकीत की त्यामागे काही गणित असावं? या बुचकळ्यात असतानाच त्या बोलून गेल्या, "मी सांगते तू लग्न करणार आणि काकांना आणि मला पेढे द्यायला येणार!" मी ते सगळंच हसण्यावारी नेलं. पण काकूंनी खरंचच बसल्याजागी काहीतरी गणित मांडलं आणि पुढच्या दोनच वर्षात २०१६साली मी लग्न केलं, तेपण अगदी थाटामाटात! काका-काकूंचे आशीर्वादही लाभले हे मोठं भाग्यच!😇 देशपांडे काका सिद्धपुरूषच, पण त्यांची अर्धांगिनी सुद्धा सिद्धम...

धन्वंतरीच्या आशीर्वादाने पावन

इमेज
उर्मिला ताई नवदुर्गेची सातवी माळ 🙏😇  मी साम वाहिनीवर 'शाब्बास' हा लहान मुलांसाठीचा कार्यक्रम करत असताना, मी शोधून शोधून काहीतरी अवली, हटके करणारी मुलं शोधून काढत असे. आणि त्या कार्यक्रमाचं अँकरिंगही तसाच हटके मुलगा करत असे. वरूण त्याचं नाव. दर रविवारी शूट असे आणि किमान ४ वेगवेगळ्या  क्षेत्रातली मुलं येत असत. या रविवारी अडीच वर्षाची जुळी मुलं आली होती, ते दोघे जो झेंडा दाखवू त्या देशाचं नाव सांगत असत. १५ ऑगस्ट निमित्त त्या लहानग्यांचा इंटर्व्ह्यू घ्यायची जबाबदारी १२ वर्षाच्या वरूणवर होती.😆 आता अडीच वर्षाची मुलं म्हणजे अगदीच बाळं, तरी त्यांना छान बिनबॅगनध्ये बसवलेलं.. ५-५  झेंडे दाखवून झाल्यावर मी त्यांना प्रश्न विचारायला सांगे. पण सेटवर खूप सारी खेळणी, बॉल आणि रंगीबेरंगी आकर्षक असं बरंच काही होतं, त्यामुळे हा आमचा छोटा अँकर, आSsss करून प्रश्न विचारू लागला की ती मुलं खाली वाकून बॉल उचल, किंवा जोरजोरात ओरडून यल्लो-यल्लो असे काहीतरी चाळे करत होते. वरूण वैतागून, "हम ते जाऊदे , मला सांग.." असं म्हणेपर्यंत एकजण उठून दोन बॉल घेऊन यायचा. मग दुसऱ्या मुलाला प्रश्न सुरू केला क...

मेहनती व कर्तृत्ववान

इमेज
माझी बॉस्स निखिला😊 नवदुर्गेची सहावी माळ 🙏😇  पहिल्या भेटीत मी अगं-तुगं करतच बोलले, आणि ५-६ वर्षे सिनिअर आहे समजल्यावर, जीभ चावतच मी म्हंटलं, मी काय अरे-तुरे करतेय, मॅडमच म्हणायला हवं, तशी ती खळाळून हसली आणि, "नको गं अरे-तुरेच कर" म्हणाली, शेजारीच सहकारी स्वानंद बसला होता, आम्ही आश्चर्यभरित नजरेनं पाहिलं आणि तिला म्हंटलंही की, हा तर  तुझ्या  मनाचा मोठेपणा! आणि आता अनेक ज्युनिअर्स मला अरे-तुरे करतात, ते मात्र तिला मुळीच आवडत नाही.😆 असो.  मी प्रेग्नंट असताना आम्ही कायम सोबतच जेवत असू,  इतकंच काय पण कधीच आवडीने आइस्क्रीम न खाणाऱ्या मला अमूल किंवा हॅवमोअरचं आइस्क्रीम खाण्याचं वेडही तिनेच लावलं. आज मुलगा चांगलाच आइस्क्रीम प्रेमी झालाय, हे वेगळं सांगायला नकोच! काय करावं आणि काय नको, याचे उत्तम धडे ती सतत देतच असते. मुळात मोठी बहीण आणि आमच्या ऑफिसमध्येदेखील मोठीच जबाबदारी असल्याने सर्वाांना सांभाळून घेत पुढे जाणे ही तिची जुनी सवय. थेट विषयाचा तुकडा पाडणं तिला जमत असलं तरी ती ते टाळते. अनेकांना संधी देऊन पुढे आणण्याचं कसब तिला सहजी प्राप्त आहे. माझी व तिची tv9 मधली ११...

मनमिळाऊ सासूबाई

इमेज
माझ्या सासूआई नवदुर्गेची पाचवी माळ 🙏😇  "काही झालं तरी शेक-शेगडी घ्यायचीच प्रज्ञा आणि बाळाला किमान वर्षभर मसाज हवा, तूपण ६ महिने घ्यायला हवा, पुढचं तुम्ही ठरवा." बाळंतपणानंतरचे हे शब्द आहेत सासूबाईंचे, गम्मत म्हणजे आई शेजारी उभी. पण तिला मुलं होऊन ३५ वर्ष झाल्याने काहीच आठवत नव्हतं. पण सासूबाईंनी लागलीच त्यांच्या लेकाला कामाला लावलं, इथे कोळसे कुठे मिळतात ते शोधून काढायला सांगितलं. कारण या वास्तूत येऊनच आम्हाला केवळ वर्ष झालेलं, इथलं काहीच माहिती नाही, पण तरी त्यांनीच विचारपूस करून ३ बायकांपैकी एक बाई मसाजसाठीही निश्चित केली. आता तिच आमच्या इमारतीत जन्मलेल्या पाचव्या बाळाच्या मसाजसाठी येतेय.☺ बरं ते कोळसे मोठ्या गॅसवर चांगले तापू द्यायचे आणि मग मोठ्या घमेल्यात घालून आणायचे, बाळाला शेक द्यायचा व मीही घ्यायचा हा रोजचा शिरस्ता. यामुळे गॅसबिलानं पार २०००चा टप्पा ओलांडला पण त्याची फिकिर त्यांनी मुळीच केली नाही. आणि घरी केलेले डिंकाचे लाडू, मी तर खायचेच पण घरी सगळेच खायचे. कोणाला काय म्हणायचं हे आपल्यासमाजाने आधीच ठरवून ठेवलेलं आहे.  आणि ९९टक्के ठिकाणी ते अगदी रास्त आहे. पण जिथे म...

कष्टाळू माता

इमेज
  माझी आई नवदुर्गेची चौथी माळ 🙏😇 "प्रज्ञा जरा खोब्र खोऊन दे गं", असं म्हणून तिने माझ्या हाती काम सोपवलं. ते काम छोटंच होतं पण माझ्या छोट्याशा हातांना करवंट्या चांगल्याच टोचत होत्या पण तरी एखादं काम दिलं की ते नेटानं करायचं ही बहुदा आम्हा मेषवाल्यांची सवयच. आई असूनही तिने माझ्यात व भावात कधी भेदभाव केला नाही. दोघांना सर्व काही समान! भले माझी बुद्धी भावाच्या तुलनेत ना के बराबर😅 पणतरीही  संधी समान दिल्या जात. पुण्या जवळच्या केडगावचा जन्म, लहानपणी बऱ्याच आजारातून ती बरी झालेली. पण कष्ट वाट्याला अफाट.. एकदा तिच्या आईला अचानक चक्कर आली आणि विहिरीतून दोन हंडे घेऊन चढतअसताना ती पाहिऱ्यांवर बसली, कळशी-हंडा विहिरीत पडले आणि आजी वाचली. तेंव्हापासून आईच्याच वयाचा भाचा जगदीश व आई व धाकटा भाऊ सुभाष असे सगळेच मिळून कावडीनेपाणी भरत असत. लागेल ती मदतताईला म्हणजेच आईला करणे हा छंदच जडला जणू. त्यानंतर शिक्षणासाठी इतर भावंडांसोबत ११वीत पुण्यात आली. पण शिक्षणाचे तीनतेराच वाजले. पण शिक्षण घेण्यासाठी अर्धवेळ काम करत शिकण्याचा प्रयत्नही केला, पण भाचा पायावर पडला आणि पायमोडला, आणि शिक्षणाला खो बसल...

कर्तृत्ववान मातृभक्त

इमेज
  माझी मावशी नवदुर्गेची तिसरी माळ 😇🙏 मावशीच्याच सांगण्यानुसार नारद मंदिरात कीर्तनाचे वासंतिक वर्ग केल्यानंतर ह.भ.प. आफळे बुवांकडे कीर्तन, गायनाचे शिक्षण सुरू होते, आणि थेट गुजरातच्या अहमदाबादेत कीर्तन ठरलं. मी पुण्यात मीना मावशीकडे राहात होते, त्यामुळे आधी  तिची परवानगी मग आईची, मी विचारताक्षणी मावशीने लगेच होकार देऊन, माझ्यासाठी बॅगही काढली. मला प्रचंड आनंद झाला.. कारण आईकडून ही परवानगी मिळण्यापूर्वी १०० प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं, त्यापेक्षा तोफेच्या समोर जाणं सोप्पं😅 असो, विनोदाचा भाग सोडला तरी, मीना मावशी BSNL ची नोकरी सांभाळून आणि घरी वयस्कर आई जिला साधं मोरीपर्यंत जायलाही माणूस लागत असे, तिला सांभाळून, मी व माझा बिलंदर भाऊ सांभाळून सुद्धा ती माझ्या प्रगती होईल असे वाटणाऱ्या कोणत्याच मार्गात अडवी आली नाही. उलट तिने कायम साथच दिली. तिच माझ्यासाठी मोलाची ठरली. मीनाक्षी अवचट, प्रवचन करताना! मला खेळायची प्रचंड आवड आणि ठिकठिकाणी जाण्याची अवेकदा संधी मिळत असे, पण खरी संधी मिळाली ती पुण्यात मावशीमुळे..सांगलीतल्या सांगलीत खोखो व्यतिरिक्तकोणता खेळ खेळले नाही. पण पुण्यात ...

कापराची वात ओवाळू तुजला.. आरती

इमेज
  कापुराची वात ओवाळू तुजला, समर्था ओवाळू तुजला | देहभाव अहंकार सहजची जाळीला || धृ ||  दया क्षमा शांति उजळल्या ज्योति, समर्था उजळल्या ज्योति | स्वयंप्रकाश रूपी  तव देखिली मूर्ती || १ ||  मी तू पण काजळ काजळी केली, समर्था काजळी केली |  निजानंदे तनु पायी ओवाळियली || २ || आनंदाने भावे कापूर आरती केली, समर्था आरती केली |  पंचतत्व भाव तनू पायी अर्पियली || ३ || 

आदर्श शिक्षिका आणि गृहिणी

इमेज
  रजनी वहिनी  नवदुर्गेची दुसरी माळ🙏😇 आम्ही ६ जणं खेऴत बसलो होतो, रजनी काकू तिथे आल्या आणि आम्हाला म्हणाल्या, "पोरांनो आता इथं सगळे पंगतीला बसणारेत, तुम्ही खेळ उचलून आत जा" रजनी काकू शिक्षिका, त्यामुळे मुलांना हाताळण्याची हातोटी उत्तमच होती. आम्ही लगेच उठून आत खेळत बसलो.. काकूंनी तो आयाताकार लांब खोलीचा भाग स्वच्छ झाडून मग पुसून घेतला. आणि मग हळू हळू अंबंटगोड वास, खरपूस भाजलेल्या पोळ्यांचा आणि भाताचा वास नाकावाटे आत शिरून भुकेची चाहूल देऊ लागला.. मी धावतच स्वयपाक घरात पोहोचले, तिथे तीन अज्ज्या आणि माझी सख्खी अत्या व रजनी काकू जुंपल्याच होत्या. एक अज्जी कोथिंबीर निवडतेय, एक लसूण सोलतेय, एक अज्जी खलबत्त्यात काहीतरी कुटतेय, एका स्टोव्हवर मोठ्या पातेल्यात आमटी खळाखळ उकळत होती आणि रजनी काकू फटाफट पोळ्या लाटत होत्या, अत्या भाजत होती.. पोळ्यांची चवडच ती रचत होती. जयसिंगपूरच्या कुलकर्ण्यांच्या घरचं हे चित्र काही आजचं नव्हतं, तर इथे रोजच असं जेवण बनायचं. आणि पंगतीच जेवायला बसायच्या. त्याअन्नाला अक्षरशः प्रसादाची चल असायची. का, ते माहित नाही पण सर्व दुर्गा तिथे रांधायच्या..  आता त...

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

इमेज
  उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो मूलमंत्र - जप करुनी भोवती रक्षक ठेवुनी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो  || १ || द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ठ योगिनी हो सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो:कार गर्जती काळ चामुंडा मिळूनी हो || २ || तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कनकाचे पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ || चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ || पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्घ्य पाद्य​ पूजने तुजला भवानी स्तविती हो रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो आ नंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।।उदो ०।।५॥ षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेउनि दिवट्या हास्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता द...

आई असावी तर अशी!

इमेज
  माझी अत्या! नवदुर्गेची पहिली माळ🙏😇 मी विदुला सोबत खेळत होते, संध्याकाळची वेळ होती. इतक्यात तिची आई आणि माझी अत्या अष्ट्याहून लगबगीनं आली, खांद्यावरची पर्स काढून खुंटिला लटकवली, हात-पाय तोंड स्वच्छ धुतलं आणि आम्हा दोघींकडे पाहून विचारलं, काय खाणार उप्पीट की पोहे, लगेच विदुलानं उत्तर दिलं पोहे, मग मलाही विचारलं, तू पण खाशील ना? मी जरा चाचरतच होकारार्थी मान हलवली. अत्या हसली आणि लगेच कामाला लागली.. तोवर श्रीपाद दादा 'भूक लागली, आई काय करणारेस?' असं विचारत अत्यापाशी आला, अत्याने लगेच विचारलं, अरे माधव कुठे, 'तो क्लासला गेलाय' असं म्हणत दादा पोहे बनण्याची वाट पाहू लागला.. थोड्याच वेळात माधव दादा आला, मग आम्ही सगळे गोल करून पोहे खात बसलो, आणि तिकडे अत्याने चार घास खाऊन चहा पिऊन, स्वयपाकालाही सुरुवात केली होती... मी पाहातच राहिले, कारण अत्या अष्टा-सांगली प्रवास काही आज करत नव्हती, ती प्रोफेसर असल्यानं रोजचाच तिचा हा प्रवास होता. पण ८ तासाचा बोलण्याचा जॉब करून, २ तासाचा रोजचा  STचा प्रवास करूनही ती तशीच फ्रेश होती. याचं मला कोडकौतुक वाटायचं. तिचा हा टवटवीतपणा मला खूप भावला....