श्री राम आम्हाला देतो।। निखळ आनंद। समाधान। संतुष्टी

श्री राम आम्हाला देतो।।


प्रत्येक मनुष्य आपल्या कुवती प्रमाणे, म्हणजे (शारीरिक,आर्थिक, मानसिक, वैचारीक इ. इ.) कार्य करत असतो. पण खरच तो जे कार्य करतो त्यात तो समाधानी असतो का..? आणि असला तरी किती समाधानी असतो...?



समाधानाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी मात्र तरीही एके ठिकाणी कुठेतरी ती समानतेवर येतेच. आता माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर, काम करताना मनासारखं काम झालं की मला फार बरं वाटतं, पण म्हणून मी समाधानी असतेच असं नाही, मात्र तेच मला एखाद्या आजी वा अजोबांनी रस्ता क्रॉस करुन देता आला तरी खूप समाधानी असल्यासारखं वाटतं.

मी शाळेत असताना मला शाळा सुटण्याच्या सुमारास एक जख्ख म्हाताऱ्या आजी भेटायच्या पांढऱ्या रंगाची, त्यावर चॉकलेटी किंवा फेन्ट गुलाबी, हिरवी फुलं असलेली साडी नेसलेल्या, वय साधारण 70च्या आसपास, चेहेऱ्यावर वयाची जाणीव करुन देणाऱ्या सुरकुत्या, पांढऱ्या केसांचा छोटासा अंबाडा, उंची जेमतेम चार-साडेचार फूट, हातात काठी आणि छोटीशी पिशवी, त्यात जपाची माळ, फुलं, खडिसाखरेचा छोटा डबा असायचा. आणि त्या नेमक्या कुणाची तरी वाट पाहत उभ्या असायच्या.(अर्थातच क्रॉस करुन देणारं कोणीतरी भेटेल म्हणून) आणि माझ्यासारख्या शाळकरी मुली-मुलं दिसल्यावर त्यांना फार आनंद व्हायचा, त्या लगेचच आमच्यापैकी एखाद्याला 'मला जरा रस्ता क्रॉस करुन देशील का गं' अशी विनंती करायच्या, मला फार आनंद व्हायचा. तेंव्हा हो हो म्हणत मी लगेच त्यांचा हात आपल्या हातात धरुन रस्ता क्रॉस करुन द्यायचे, मग त्या बक्षिस म्हणून माझ्या हातात खडिसाखर ठेवायच्या. पण अगदी खरं सागते, त्यांनी हातात ठेवलेल्या खडीसाखरेपेक्षाही त्यांना मदत केल्याच्या आनंदाची गोडी काही औरच असायची. असा अनुभव मुंबईत मला अत्तापर्यंत एकदाच आलाय.

आता समाधान म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात येत असेल. समाधान ते असतं, जे आपण केलेल्या कोणत्याही कामाचा पूर्ण आनंद देऊन जातं. 'निखळ आनंद...' असा आनंद प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवशी एकाच कामातून मिळेल असं नाही. म्हणूनच मनात पुन्हा विचार येतो, मी खरंच मनाला पटेल ते काम करतीय पण हे काम मला पूर्ण समाधान देतंय का...? आणि नसेल देत तर मग मी इथे का थांबलीय?

मला केवळ पगार मिळतो म्हणून मी काम करते का?  की आनंदही मिळतो म्हणून मी आहेय पण मग खरा आनंद जर यात नाही हे कळतंय तर मी का थांबतेय? माझं उद्दीष्ट स्पष्ट आहे का? प्रश्न भरपूर आहेत पण उत्तरंही अनेक आणि तऱ्हे तऱ्हची आहेत.

खरं सांगायचं तर माझं ध्येय आणि उद्दीष्ट पक्कं आहे. पण अजून वेळ आली नाहीये, मला वेळ आल्यावर थांबांयचं नाहीये. मला माहिती आहे की मी कोणी साधू संत किंवा महान हस्ती नाही पण अशांच्या कार्याचा मला आदर वाटतो,  ते लोक मला आदर्श वाटतात. मी त्यांच्या कार्याचा मान राखते आणि त्या कार्याची मला आवड आहे. मी ते कितपत पेलू शकते माहिती नाही पण मला त्या कांमाच्या काही भागाचा वसा घ्यायचाय. ज्याप्रमाणे मदर तेरेसांनी मरणप्राय लोकांसाठी dying roome उभं केलं तसंच मलाही एक वृद्धांसाठी कार्य करणारं स्थळ उभं करायचंय. कधी केंव्हा कुठे माहिती नाही....पण मी हे कार्य तडीस नेणार हे नक्की. अर्थात मी करणारी कुणी नाही, त्याच्या मनात असेल तर तो माझ्याकडून सेवा करवूनच घेईल.

शेवटी समर्थ म्हणतातच ना..

आम्ही काय कुणाचे खातो।

श्री राम आम्हाला देतो।।

आणि हाच भाव मनात असेल तर खरं समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. अजून अनेक टक्के टोणपे खायचेत. बरंच काही पहायचंय, अत्ताशी कुठे सुरुवात आहे.....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान