राजकारणाच्या केंद्रस्थानी उद्धव ठाकरे
उध्दव ठाकरेंचं पारडं जड!
ठाकरे - फडणविसांची एकत्र 'लिफ्टवारी' खूपच बोलकी आणि राजकारणातल्या केंद्रस्थानी आलेल्या उध्दव ठाकरेंचं राजकीय महत्त्व अधोरेखित करणारी आहे.
भलेही अजब तुझे सरकार म्हणत अनेकांनी चेष्टा केली असली तरी आजच्या घडीला सर्वांनाच उद्धव ठाकरेच हवे आहेत.. याचं मुख्य कारण पक्ष फुटूनही शिवसेनेचे उबाठा गटाचे ९ तर शिंदे गटाचे ७ खासदार निवडून आलेत. म्हणजे खरंतर राज्यातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस (१३ आणि १ अपक्ष असे १४ खासदारांसह) मोठा ठरला असला तरी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मिळून १६ खासदार निवडून आलेत.. उद्या जरी हे दोन्ही गट दिलजमाई करत मनोमिलन करत एकत्र आले तर यांच्या जागांमध्ये घसघशीत वाढ होऊ शकते. याचं कारण शिंदेचे खासदार जरी कमी असले तरी त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आलाय. याचाच अर्थ हे एकत्र लढले असते तर कदाचित १६च काय २० पेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळू शकल्या असत्या.. आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती होती म्हणून त्यांना जागा मिळाल्या.. पण तुम्ही देशातल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाचे आकडे पाहिले तर अनेक गोष्टी अधोरिखित होतात. आणि शिवसेनेचं देशातलं स्थान कसं वाढतंय याचा पुरावाच मिळतो..
भाजप - २४०
काँग्रेस- ९९
समाजवादी पक्ष- ३७
तृणमूल काँग्रेस- २९
द्रविड मुन्नेत्र कळघम- २२
टीडीपी- १६
शिवसेना (उ.बा.ठा.)- ९
शिवसेना (शिंदे गट)- ७
हीच बाब सूज्ञ राजकारण्यांना खुणावतेय त्यामुळेच सध्या आपल्या सोईसाठी किंवा स्वार्थासाठी म्हणा, 'उद्धव ठाकरे सर्वांनाच हवेहवेसे झालेत.'
एकीकडे संजय राऊतयांनी मविआच्या यशाचे 'जनक' उद्धव ठाकरे हेच असल्याचा मुद्दा पुढे करत त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहेरा करा असं म्हणत मविआच्या नेत्यांवर गुगली टाकलीय. आणि त्यावर वडेट्टीवार, राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी तीव्र प्रतिक्रिया देणं टाळत आम्ही बैठकीत ठरवू आणि मीडियात प्रतिक्रिया देऊन पद ठरत नसतात असा टोला लगावलाय. तर संजय राऊत यांच्यावर आम्ही बोलत नाही असं म्हणत नाना पटोलेनी यावर उघड भाष्य करणं टळलंय. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना लिफ्ट बाबत केलेल्या प्रश्नावर, "योगायोगाने झालेली भेट होती, पण लिफ्टला कान नसतात त्यामुळे पुढील बैठका लिफ्टमध्येच करू", असं सूचक विधानही केलं.
त्यामुळे महविकास आघडीमधलं वाढलेलं वजन आणि महायुतीकडून गोंजरण्याचा सुरू असलेला प्रयत्न यामुळे उद्धव ठाकरेंची पाचही बोटं तुपात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आता उद्धव ठाकरेंचं पारड चांगलंच जड आहे. चंद्रकांत पाटलांनी दिलेलं चॉकलेट फळत की 'लिफ्ट करादे..' वाली चर्चा कमी येते हे महाराष्ट्र पहिलंच!
©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक
.png)
.png)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा