आठवणींना उजाळा- १. रेशन दुकान
खूप दिवसांनी लोक रांगेत उभे राहून सामान खरेदी करताना पाहीले.. खरंतर मुंबई सारख्या ठिकाणी किराणा माल आणि तोही रांगते हा प्रकार मला अजब वाटला, पण मुंबईतल्या गरीब लोकांसाठी टेंपोंधून धान्य आणून देण्याची ही पद्धत पूर्वापार आहे म्हणे.. काहीही असो, पण मला जुन्या दिवसांची आठवण झाली.. मी लहान असताना आमच्या घरी रेशनकार्डावरचं रॉकेल आणि साखर आणली जायची. आमच्याकडे मी जवळपास चवथीत जाईपर्यंत म्हणजे १९९२ पर्यंत गॅसची शेगडी नव्हती, आमच्या घरचा स्वयंपाक आई स्टोव्ह आणि वातीचा स्टोव्ह यांच्या मदतीनं करायची. पण आईच्या हातालाच अशी चव की सारी दुनियाच तिला सुगरण म्हणत असे, कारण ती जे करते ते उत्तमच बनते ही तिची म्हणजे खऱ्या सुगरणीची खासियत आहे.. असो, मुद्दा असा की मी जशी मोठी होऊ लागले तसं, मलापण आईशिवाय रेशनच्या दुकानात जाण्याची वेळ येऊ लागली, मी पाचवीत असतानापासून हातात रॉकेलचा डबा घेऊन आई रांगेत उभं राहायला सांगायची. रॉकेल आणि साखर आणण्यासाठी रेशनच्या दुकानात आवश्यक असणाऱ्या सर्व टप्प्यांबद्दली माहिती आईनं मला दिलेली असायची.. आणि रेशनच्या दुकानातल्या काकांनाही ही एकटीच आहे हं, जरा लक्ष ठेवा मी येतेच असं सांगून शाळेला जाण्याच्या तयारीसाठी ती निघून जायची..
मी अभ्यासात ढ..गणित कच्चं, आणि मुळातून आवश्यक असणारा आगावूपणा(कासकरुन सार्वजनिक ठिकाणी आवश्यक असणारा पक्केपणा) माझ्यात नाही, त्यामुळे कोणी फसवू नये असं अपलं तिला वाटायचं.. असो,
ती गेली की माझी निरीक्षणाला सुरुवात व्हायची.. मला रॉकेल देणारे काका फार भारी वाटायचे.. आणि त्या काकांचं फार आश्चर्य वाटायचं, कारण प्रत्येकाच्या रेशन कार्डावरील आकडेवारी पाहून त्यांच्या कार्डाला आपल्या हाताचं रॉकेल लागणार नाही याची काळजी घेत ते रॉकेल द्यायचे.. त्यांच्याकडे पाव लिटर, अर्धा लिटर आणि एक लिटरची अशी मोठी मापटी होती पण ती दुधाच्या मापट्यांप्रमाणे नसत, त्या भांड्याला चोचीप्रमाणे मोठं तोंड असे आणि ती त्रिकोणी आकाराची असंत.. रेशनचं रॉकेल बॅरल अडवा करुन सायकलच्या चाकांपेक्षा थोड्या मोठ्या चाकांच्या एका छोट्या गाडीला लावलेला असे आणि त्याला नळ आणि त्या नळाला कुलुप लावण्याची सोय असे, त्या तोटीतून रॉकेलच्या मला आवडणाऱ्या खास मापट्यातून काका भराभर प्रत्येकाला रॉकेल देत असत.. बायकांची बडबड, लहान पोरांनाकडे-खांद्यावर घेऊन आलेले पुरुष-बायकांचा बराच गलका चाललेला असायचा.. त्याच गलक्यात करड्या आवाजात 'हां.. चला मोरये.., कांबळे, मान्ये, गावड्ये, जोशी.., चला फुडं व्हा, फुडं व्हा.. झाकणं फुडं जावून लावा' अशी नावं घेत आणि ऑर्डर करत तो काका प्रत्येकाला हकलायला बघायचा.. कारण 'अव काय सांडताय खाली..', 'किवडा फेस हाय, रॉकल मिळू दे की आमास्नीपण', 'ओतताना हालिवतोयस कशाला..' असे आणि अशा आशयाचे आवाज ऐकू यायचे, पण माणसाचा स्वभाव म्हणजे, कितिही मिळालं तरी ते कमीच वाटतं तशी सर्वांची आवस्था झालेली असायची.. आणि काकांचा त्यात काही दोष आहे असं मला वाटायचं नाही.
कारण बॅरलचा तो नळ चागला पितळी भक्कम मोठा-दांडगा असायचा. तो उघडला की रॉकेल फुल फोर्सनी बापेर यायचं, त्यामुळे मापट्याच्यावरती फेस यायचा, आणि मापटं जास्त भरलं तर ते सांडणार त्यामुळे फेस वर पर्यंत आला की हा नळ बंद करुन रॉकेलच्या डब्यात रॉकेल ओतायचा.., आता जर फेस येऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी तोटी अगदी हळूवार सोडणं गरजेचं होतं, पण मागे इतकी मोठी रांगद असायची की इतकं हळू हळू काम करायला वेळ नसायचा, त्यात बरेचजण रांगेत जास्तवेळ ताटकळण्याची वेळ नको म्हणून लवकरात लवकर जाऊन रेशन दुकान उघडण्याआधीच रांगा लावू उभे असायचे कारण प्रत्येकालाच नंतर नोकरी धंद्यावर जायचं असायचं.. मला सुरुवातीला मजा यायची पण तो २-३ लिटरचा डबा घेऊन घरी जायला कंटाळा यायचा.. कारण सकाळी ८ वाजता गेलेले साधारण दीड-डोन तासांनी हललेली असायचे.. सुरुवातीला चालताना काही वाटायचं नाही पण मध्येच रॉकेलचा डबा खूप जड वटायचा, इतक्यात समोरुन आई येताना की जरा बरं वाटायचं.. कारण ती शिक्षिका असल्यानं तिला सुद्धा शाळेत जायचं असाचं आणि माझी शाळेला जाण्याची तयारीही बाकी असायची.. घरी गेल्या गेल्या अंघोळीच्या आधी रॉकेलचे हात धूवून मग अंघोळ उरकायची (नाहीतर मी कपड्यांना लावेन ना रॉकेलचे हात.. म्हणून..) मग काहीतरी नाष्टा करायचा आणि शाळेला पळायचं.. तशीही मी वेळेत शाळेला फार कमीच जायचे, पण तरीही आज बरंच काम केलं हा भावही असायचाच...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा