वारी म्हणजे काय? शासकीय पूजा म्हणजे काय?
वारी म्हणजे काय
? #wari #वारीम्हणजेकाय
‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर’ असं पंढरपुराचं वर्णन करता येईल.. तर काही
वारकऱ्यांना संत तुकोबांच्या अभंगातील ।आनंदाचे डोही, आनंद तरंग। आनंदची अंग
आनंदाचे।। या ओळींचा अनुभव येत असेल.. तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे
।जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले, म्हणूनी विठ्ठले कृपा केली।। असा भाव अनेक
वारकऱ्यांच्या मनात आहे.. तर संतश्रेष्ठ तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे अनेक
वारकऱ्यांचा अनुभव हा असा असतो
आमुची मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥
पांडुरंग आमुचा पिता । रखुमाबाई अमुची माता ॥२॥
भाऊ पुंडलीक मुनि । चंद्रभागा अमुची बहिणी ॥३॥
तुका जुनाट मिरासी । ठाव दिला पायापाशीं ॥४॥
आनंदाचे क्षण म्हणजे वारी, माहेरची आठवण म्हणजे
वारी, संताचा सहवास म्हणजे वारी, अन् मायेची ऊब म्हणजे वारी... वारीचं असं कितीही
वर्णन केलं तरी अपुरंच...
वारीची परंपरा
मजल दरमजल करत जी पायवाट फक्त आणि फक्त विठ्ठल आणि संतांच्या नामाने चालली जाते ती पायवाट म्हणजेच वारी.. वारीची परंपरा तशी हजारो वर्ष जुनी आहे.. तेराव्या शतकात देखिल ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या म्हणजेच ठोसरांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपराच होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आहे.. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपथांच्या लोकांना एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतलं.. हेच व्यापक स्वरूप जपून एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली आणि नुसती चालवली नव्हे तर वाढवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबातही वारीची परंपरा होती. वारीची ही परंपरा सर्व संतांनी जतन आणि वृद्धिंगत केलीय.
ज्ञानदेवपूर्व
काळ-भक्त पुंडलिकाचा काळ
ज्ञानदेव-नामदेवांचा काळ
भानुदास-एकनाथांचा
काळ
तुकारामांनतर साडेतीनशे वर्षांचा काळ
शासकीय महापूजा म्हणजे काय
? #शासकीयमहापूजा
आषाढ महिन्याच्या एकादशीच्या पहाटेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलाय.
त्यांच्या बरोबरच दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला दरवर्षी
पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणं म्हणजे जन्माचं सार्थकच म्हणा की.. कारण दर्शन
रांगेत हे वारकरी किंवा अन्य भक्त हे केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत १८
ते २० तासांपासून उभे असतात. आणि जेंव्हा दर्शनाची संधी येते आणि केवळ दर्शन नव्हे
तर विठ्ठल रुक्मिणीची स्वहस्ते पूजा होते, तो सोहळा काय वर्णावा. सामान्यतः असे
प्रथम पूजेचा मान मिळणारे वारकरी हे शेतकरी कुटुंबातीलच पाहायला मिळाले आहेत. आनंदाचे
डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे।। हाच तो अनुभव असतो.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा