माझ्या गावचा वारणेचा वाघ...


    हिंदकेसरी मारूती मानेंची तशी वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. पण मारुती माने हे आपल्याच गावचे म्हणजे कवठेपिरानचे असल्यानं मला आणि माझ्या भावाला त्यांचा कोण अभिमान..! भले आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही तरीही त्यांच्याबद्दल अभिमान अजुनही कायम आहेच..
    ऑफिसमध्ये पाऊल टाकलं आणि मारुती माने गेल्याची बतमी पाहिली. लागलीच मी बाबांना फोन केला... बाबा अंत्यदर्शनाला आणि अंत्यविधाला गेले.. खरंतर मी नुसतीच नावचीच कवठेपिरान या गावची, पण बाबांचा, माझ्या चार काकांचा आणि दोनही आत्यांचा जन्म कवठेपिरानचाच. त्यांची शिक्षणंही तिथेच झाली.. पण बाबांकडून, काकांकडून मारुती मानेंचं नाव बरंच ऐकलं होतं... कवठेपिरान ह्या़ गावाची ओळख म्हणजे गुंडांचं गाव... पण मारुती मानेंनी ती ओळख बदलली.. हिंदकेसरी मारुती मानेंचं गाव आणि अलिकडेच कवठेपिरान हे ग्रामस्वच्छाता अभियानाअंतर्गत पहिल्या क्रमांकाचं आलेलं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली ती त्यांच्यामुळेच. या मारुती मानेंनी हालाखीच्या परिस्थितीतून अक्षरशः शून्यातूनच सगळं ऐश्वर्य उभं केलं...

    हे सगळं मला माहिती असण्याचं कारण म्हणजे माझे काका आणि बाबा.. मारुती माने गेल्याची बातमी कळली आणि मी काकांना फोन केला.. त्यांचा मारुती मानेंशी प्रत्यक्ष संबंध आलेला असल्यानं त्यांना बोलतं करावंसं वाटलं, आणि आठवणींना उजाळा मिळाला....
शाळेत असताना काका आवडीनं तालमित जात असत.. तिथे त्यांची भेट या मारुती मानेंशी व्हायची.. काका आणि मारुती मानेत साधारण पाच-सहा वर्षांचंच अंतर. काका सांगतात, जरी आमच्यात फारसं अंतर नसलं तरी आम्ही आणि गावातले सगळे त्यांना भाऊ म्हणायचे. ते मला कायम, 'काय रे बामणाच्या पोरा..' अशी हाक मारायचे, काका रागावून त्यांना म्हणे,'माझं नाव नंदकुमार आहे, हवं तर नंदा म्हणा मला'.... पण मारुती माने मोठ्या खुबीनं, 'ते नाव बीव काय ध्यानात येत न्हाई बघ माझ्या'... असं म्हणत तालमीत आलेल्या या पोरांना लाल माती फासण्याचं आवडीचं काम इमाने-इतबारे करायचे.. तोतो ही शाळकरी पोरं म्हणजे माझे काका, त्यांचे मित्र खूप चिडायचे.., 'पैलवानच तुम्ही, तुमची अक्कल गुडघ्यातच..' अशी चिडवाचिडवी चालायची.. पण काका सांगतात, मारुती माने कधीही चिडलेत, रागावलेत असं आठवत नाही... ते कधीच कुणावरीही चिडत नसत... 'आम्ही पोहायला वारणा नदीवर जात असू, त्याचा धाकटा भाऊ माझ्याच वर्गात होता.. आम्हा पोरांना उचलून गरागरा फिरवून पाण्यात टाकून देण्यात भाऊ पटाईत.. त्यांची उंची, देहयष्टी म्हणजे अबब..! पण आम्हालाही असं गिरक्या घेत पाण्यात पडायला खूप मजा येई...इतका खेळवड होते, पण तितकेच चौकसही.. नवीन काहीही आपल्याला माहित नसेल ते चोखंदळपणे विचारायचे....
    काका सांगत होते, त्यांची खासीयत म्हणजे त्यांना कुठलंही व्यसन नव्हतं... कवठ्याला भाऊ आणि त्यांचे काही मित्र ब्राह्मणपुरीत कट्ट्यावर बसत असत. माझे काकाही कघीमधी त्यांच्यात जात असत. तिथे त्यांच्या गप्पा म्हणजे कोणता पैलवान कसा, आता कुठे कुस्ती इ.इ. पण जमीनी विकत घेण्याचा त्यांना भारी शौक होता.. त्यामुळं जमीनींसंदर्भातल्याही त्यांच्या गप्पा रंगायच्या. 'कुस्ती ठरली की करार पत्र, आणि जिंकली की खरेदी पत्र' असं जणू काही समीकरणच बनलं होतं त्यांचं...'व्यायाम करा, कुस्ती खेळा आणि व्यसन करु नका' ह्या त्रीसूत्रीप्रमाणे ते स्वतः वागायचे आणि गावातल्या इतर तरुणांनीही त्यांचा अवलंब करावा असं म्हणणं असायचं भाऊंचं..
    कवठेपिरान गाव तसं लहान, त्यात मारुती माने ह्या नावला आता वलय निर्माण झालं होतं. पण मारुती माने गावातल्या प्रत्येकाला नावानिशी ओळखायचे आणि तशीच विचारपूसही करायचे.. आमच्या आजोबांबद्दलही त्यांच्या मनात विशेष प्रेम होतं. सगळा गाव माझ्या आजोबांना देव माणूस म्हणायचा. काका सांगत होते की, आमचं कवठेपिरानचं घर ज्यावेळी विकायचं ठरलं, तेंव्हा आमच्या मोठ्या काकांना म्हणजे अण्णा काकांना, मारुती माने येऊन भेटले होते,त्यांना आमचं घर घ्यायचं होतं, पण काही कारणानं ते शक्य झालं नाही. माझे सगळ्यात मोठे काका म्हणजे अण्णा काका सांगलीतले प्रथितयश वकिल होते, लक्ष्मण मेरेश्वर कुलकर्णी. त्यांच्याकडून मारुती माने कागदपत्रं, किंवा संबंधीत माहिती, सल्लेही घेत असत.
    माझे दोन्ही मोठे काका सातवी-आठवीनंतर सांगली शहरात शिकायला आले, पण तरीही मारुती माने सर्वांची नावाने चौकशी करायचे. जेंव्हा माझे काका त्यांना गावात किंवा सांगलीत भेटायचे तेंव्हा ते त्यांना अवर्जून विचाराय़चे,'काय रे बामणाच्या पोरा, कुठं हाईस नोकरीला?, तुला जर नोकरीबिकरी हवी असल तर गाडीवर बसायचं, अन नुसतं सांगायचं कुटं नोकरी हवीय.. फक्त सायबाला माझं नाव सांगायचं, न्हाईतर मीच बोलीन सायबाशी..' पण वशिल्यानं कामं मिळवणं आमच्या मुळातच नसल्यानं, काका त्यांना स्पष्टपणे नाही सांगायचे.. पुढे काका नोकरीच्या निमित्ताने मुंबईतच असतात हेही मारुती मानेंना ठाऊक होतं, त्यामुळे भेटले की लगेच, 'मुंबईत कुठंय ऱ्हायला सांग तू, मी येतो तुझ्याकडं..' म्हणायचे...
    अतिशय गरिबी असूनही केवळ हिम्मत आणि जिद्दीच्या जोरावर मारुती मानेंसारखा खरा माणूस तयार झाला. त्यांची जिद्द पाहून गावातल्या लोकांनीही त्यांना मदत केली. पण त्या मदतीची जाणीवही मारुती मानेंनी ठेवली. सर्वांशी हसत खेळत बोलणारा, विनोदी वृत्तीचा, मनमिळावू आणि शांत वृत्तीचा पहिलवान माझ्या गावाला लाभला, याचा मला सार्थ अभिमान आहे! पण मला कधीही प्रत्यक्ष न भेटताही आठवणींमधून कळलेला वारणेचा वाघ हरपला याची रुखरुखही आहेच...

टिप्पण्या

  1. भाऊंबद्दल इतका सुरेख लेख लिहील्याबद्दल प्रज्ञा, तुझे आभार...

    मी आयुष्यात माती मानेंना दोनदा भेटलो...एकदा शाळेत असताना, आणि एकदा नुकतेच काही दिवसांपूर्वी...

    माझ्या बाबांना आणि त्यामुळेच मलाही कुस्त्या पहाण्याचा भारी शौक्!त्यात आमचे अख्खे गावच कुस्त्यांची पंढरी असल्याने (भाऊंमुळेच)ती आवड रक्तातच!मारुती माने<चे वैशिष्ठ्य म्हणजे कुठेही कुस्तीचे मैदान असुदेत..पहिलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी ते स्वत: जातीने हजर असत...असेच एकदा सांगलीच्या तरुण भारत मैदानावर ते आले होते...मला कुस्ती पेक्षा त्यांना भेटण्याचीच ओढ जास्ती लागलेली...बाबा मला त्यांचे समोर घेऊन जाताच माने म्हणाले, "काय रे कृष्णा, कसं काय चाल्लय?" इतक्या मोठ्या माणसाने माझ्या वडीलांना नावासकट ओळखलेले पाहून मला खूप ारी वाटले..बाबा म्हणाले, हा आमचा छोकरा, तुम्हाला बघायला आलाय...त्यांनी माझ्या पाठीत एक मस्त थाप टाकली...पण माझ्यासाठी तो धपाटा ठरला! मी १ फ़ूट पुढे हललो!त्यांचा तो अजस्त्र देह, पुंड्या उसाच्या पेरासारखी मोठमोठी बोटे, त्यातल्या त्या अंगठ्या, हे सारे मला अजुनही स्पष्ट आठवते आहे... भाऊ त्या दिवशीच माझ्या मनात कोरले गेले...

    नंतरची भेट अगदी १-२ वर्षांपूर्वीची...मी सहज भटकायला म्हणून बाईकवर ताम्हीणी घाटात गेलो होतो..येताना पाहीले की पिरंगुट गावात कुस्त्यांचा फ़ड आहे...मी ती पाटी वाचून पुढे जाणार इतक्यात कुणीतरी बलले अजुन मारुती माने कशे नाही आले? मी लगेच गाडी पर्क केली! चांगला २ तास वाट बघत थांबलो! जशी त्यांची गाडी आली तसे लोकं कुस्त्या सोडून गाडी भोवती गोळा झाले! इअतक्या वर्षानंतरही त्यांना लाभलेले हे स्टार स्टेट्स मला निश्चितच सुखावणारे होते! तेंव्हाही मी जाऊन त्यांन भेटलो...नमस्कार केला...त्यांनी माझी, माझ्या बाबांची आणि सर्व काकांची व्यवस्थीत चौकशी केली...गम्मत म्हणजे त्यानंतर सारे आयोजक पहिलवान वगैरे माझ्याकडे परम आदराने बघू लागले! मला मौज वाटाली!
    मध्ये एकदा हीला घेऊन मी गावात जाऊन आलो...तेंव्हा त्यांना भेटायचा मानस होता पण भाऊ बाहेर गेले होते...सतत दौरे, समाज कर्य शेवटपर्यंत सुरु होते त्यांचे...
    त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा आता पूर्ण होणार नाही...त्यांचे वारसदार भीमराव माने त्यांचाच वसा चालवीत आहेत...

    आमच्या गावचे वैभव हरपले...गावची शानच गेली...पूर्ण जगाला ज्या एका माणसामुळे कवठे पिरान हे नाव माहीत झाले तो "माणूस" गेला...कुस्तीचा हिंदकेसरी गेला...भाऊ तुम्हाला सद्गती लाभो...

    उत्तर द्याहटवा
  2. वा खूप छान लेख लिहिला आहे. मला कुस्ती बद्दल काहीच माहिती नाही. पण प्रशांत नी यांची आठवण मला संगितल्याचे मला स्मरत आहे. आम्ही डिप्लोमा ला असताना सांगली आणि कवठे पिरान बद्दल मी खूप गोष्टी ऐकल्या आहेत. तो त्याच्या बाबांबद्द्ल सांगायचा की मझ्या बाबांना क्रिकेट हा खूप फालतू खेळ वाटतो आणि कुस्ती आवडते. कारण कुस्ती मध्ये एकेका क्षणाला काय होइल ते सांगता येत नाही.
    .. मिहिर

    उत्तर द्याहटवा
  3. हो! आमचे तीर्थरूप भयानक शिव्या घालत असत क्रिकेटला...त्यामुळेच मी अयुष्यात कधीही क्रिकेटची १ बॆट पण विकत घेऊ कलो नाही! ते म्हणायचे, कुस्ती बघ क्षणाक्षणाला डाव पालटतो! १ क्षण दुर्लक्ष करता येत नाही कुस्ती सुरु झाल्यावर! आणि क्रिकेटमध्ये मात्र एकेक बॊल टाकायला २-२ मिनिटे आणि एवढे करुन खेळाडू बॊल प्लेड ठेवतो...

    उत्तर द्याहटवा
  4. छान व्यक्तिचित्रन. आवडले मला. पण मारूती मानें गेल्यामुळे संपुर्न महाराष्ट्राचेच नुकसान झाले आहे. वाईट वाटले फ़ार.

    उत्तर द्याहटवा
  5. Khoop Sundar Lekh ahe ha, Mi Hi Praktyakshat Maruti Manena Bhatlo naslo Tari, tuzya Ya lekhane Tyanchi Bhet Ghadvoon Dili. Eak Sinha Dolya samor nirman kelas lekhatoon... vishesh Abhar

    उत्तर द्याहटवा
  6. आज दुपरी जेवताना विषय निघाला आणि (टीव्ही-रीयालिटी शोज-खली-आणि मारुती माने) अनुक्रमे तो मरूती मानेंनवर येउन स्थीरावला होता.जेऊन आलो तर प्रशांतने लिंक पठवली आणि पहिलाच लेख हा वाचला. गम्मत वाटली योगा योगाची. मी सांगली मधेच त्यांना एक दोनदा पाहीले आहे. अगदी कौतुकानी मझ्या बाबांनी मला त्यांच्याबद्दल सांगीतले होते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान