सोप्पा उपाय आणि योग्य वेळ

      सर्वांना आपल्यासारखाच तो, किंवा ती असं मानणं किती चूकीचं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
      झालं असं की ऑफिसमध्ये त्याचं आणि त्याच्या मित्राचं(अर्थात ज्या व्यक्तिला तो आपला चांगला मित्र मानत होता असा..) कडाक्याचं भांडण झालं. चूक नसतानाही त्याला वरिष्ठांच्या जोरामुळे आणि मित्राच्या खोटेपणामुळे बरंच ऐकून घ्यावं लागलं. त्यात त्याची नोकरी जाता-जाता वाचली.. आणि त्याला आयुष्यात इतका जबरदस्त वाईट, पण चांगला धडाच मिळाला जणू.. ज्याच्यावर आपला चांगला सहकारीच नव्हे तर चागला मित्र म्हणून त्यानं विश्वास ठेवला त्यानं त्याचा केसानं गळा कापला. हे सगळं सांगताना अमनला हुंदका आवरेना. आणि अमनला समजावणं मला फारच कठीण झालं.. कारण त्याला एकवेळ नोकरी गेली असती तरी चाललं असतं, पण हे असं, कारण नसताना भलतं-सलतं ऐकून घेणं नको होतं.. पण तेच घडलं होतं. आणि त्याच्या 'सोकॉल्ड' मित्रानं त्याचं नाव जितकं खराब करता येईल तितका प्रयत्न केला होता. हे सगळंच त्याच्यासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. यातून बाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न सुरु होता. पण रोज रोज तेच ऑफिस, तेच विश्वासघातकी चेहेरे, काही बळच खुन्नस देणारे चेहेरे, काही संशयाने पाहणेरे चेहेरे, आणि सगळं काही माहिती असून आपण त्यातले नव्हेच असे काही लोक त्याला डोळ्यासमोर नको होते. आणि तेच त्याच्या नजरे समोर सतत फिरत होते...
      परिस्थिती वाईट अशासाठी की, नोकरी सोडणं शक्य नव्हतं, कारण नुकतंच लग्न झालं होतं आणि नवीन फ्लॅटही बुक केला होता. तो अख्खा लटकला होता. अजून हातात दुसऱ्या नोकरीचा पर्याय उपलब्ध नसल्यानं आणि शोधूनही नोकरी मिळत नसल्यानं, तो पुरताच मेटाकुटीला आला होता. या अशा अवस्थेत मला अमनचं सांत्वन करावं, काही मार्ग सुचवावा की जाऊदे आता.. असं सांगावं कळत नव्हतं. आम्ही दोघे फोनवर बोलता बोलता शांत झालो होतो. अमनच्या बारीक हुंदक्यांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता.. आणि काय बोलावं सुचत नव्हतं..  काही तरी बोलावं, किमान त्याचं सांत्वन व्हावं म्हणून मी बोलू लागले, 'तू इतकं टेंशन का घेतोयस, आणि खोटं वागणाऱ्या लोकांसाठी आपण आपले आश्रू ढाळायची काय गरज? त्यापेक्षा जे होतं ते चांगल्यासाठीच इतकं लक्षात ठेव. या वागण्यानं तुझ्या मित्राचा तात्पुरता फायदा झाला असेलही कदाचित, पण हेच चित्रं कायम राहील असं कशावरुन? अत्ता जरी तुझ्या बाजूनं फासे पडले नसले तरी तुझं सत्य लपून राहणार नाही..' मी आपलं सांत्वानचा प्रयत्न करत होते.. तितक्याच त्वेषानं अमन ओरडला, 'नाही असं नाहीए.. जोपर्यंत माझा बॉस बदलत नाही तोपर्यंत ते शक्य नाही...' पुन्हा आम्ही दोघे शांत...
      आणि अचानक मला आठवलं आणि मी बोलू लागले,'हे जे घडतंय, त्यामुळे तुला प्रचंड त्रास होतोय आणि म्हणून तू नक्कीच त्या त्या लोकांच्या नावे मनातल्या मनात का होईना बोटं मोडत असशील, शीव्या घालत असशील त्यांना...' तिकडून शांत आवाज,' नाहीतर काय... सध्या मी तेच करु शकतोय..' मला एक खूप महत्त्वाची घटना आठवली, आणि मी त्याला सांगू लागले 'ज्या व्यक्तीबद्दल तुझ्या मनात अत्यंतिक तिटकारा असेल त्यात्या व्यक्तिबद्दल तू मनातून अत्यंतिक आदर आणि प्रेमभाव निर्माण कर, कदाचित सुरुवातीला तो लटका असेल पण असुदे.. ते अत्ता कसेही वागले असले तरी ते मुळात तसे नाहीत.. हे आठव आणि तोच भाव मनात पक्का ठेव...' या माझ्या बोलण्यावर त्याची अपेक्षित संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली... त्यानंतर विषय बदलून आम्ही खळखळून हासलो... त्याचा ताण थोडा का होईना कमी झाला.. त्यानंतर भेटू-बोलू अशी नेहेमीची खोटी आश्वासनं देत आम्ही फोन ठेवला...
      हा फोनवरचा संवाद झाल्यानंतर अक्षरशः पाचव्याच दिवशी अमनचा मला फोन आला.. तो इतका खूष झाला होता, की ब्बास... मला अमनकडून फोनवर अशी हसत बोलायला सुरुवात होईल, आणि तीही इतक्या पटकन हे अपेक्षित नव्हतं. तो खूश होऊन सांगत होता, 'उपाय झाला गं.., माझ्या मित्रानं चूक मान्य केली आणि बॉसने तर मला प्रमोशनच दिलं.. फुल फिदा झालाय बॉस माझ्यावर!'... खूप खूप थँक्स...! तू तर माझं कामच करुन टाकलंस... इतका सोप्पा उपाय तू मला आधीच का नाही सांगितलास? आधी सांगितला असतास तर हिच्या बापाशी, आय मीन सासऱ्याशी फार कटकटी नसत्या कराव्या लागल्या..' तो हसत हसत बोलत होता... मला फारच आनंद झाला. म्हंटलं अरे सोप्पा उपाय जरी असला तरी तुझी वेळ आली नव्हती.. वेळ आली तसा उपाय बाहेर पडला.. आणि लागूही झाला.. गुड गुड.. बरं झालं, आता कोणावरच विसंबून राहू नकोस. आणि नोकरीच्या ठिकाणचे सगळेच आपले मित्र होतील किंवा असतात या भ्रमातही राहू नकोस.. हो, पण तुझ्या चांगल्या मित्रांना हा नामी आणि सोप्पा उपाय सांगायला विसरू नकोस...' संबंधीत काही किस्से आठवल्यानं आम्ही पुन्हा खळखळून हासलो. भेटू-बोलू ही नेहेमीची आश्वासनं आणि यावेळी आता पार्टी हवी अशा गप्पा ठोकत फोन ठेवला. टेन्शन फ्री झालेला त्याचा आवाज ऐकून मला फार बरं वाटलं.. आणि हा सोप्पा उपाय खरोखरीच वेळ आल्याशिवाय बाहेर पडत नाही हे मला प्रकर्षानं जाणवलं...
कारण माझ्याबाबतीतही हेच घडलं होतं ना..! :P

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान