माझी आजी

माझी आजी....
      नुसतं आजी जरी म्हंटलं, तरी डोळ्यातलं पाणी मी थांबवू शकत नाही.. तिचा जन्म १९१४ सालचा, ९६ वर्षाची होती ती.. ती कधीतरी आम्हाला सगळ्यांना सोडून जाणारच याची कल्पना असूनही मला तिच्या जाण्यानं जो धक्का बसला, त्यातून बरेच महिने सावरण्याचा प्रयत्न करत होते.. आजही मी त्या प्रयत्नात यशस्वी झालेय असं मला वाटत नाही. अर्थात मला तिचा सहवास अत्यल्पच लाभला असं म्हणायला हवं.. कारण साधारण ५ वर्ष मला तिचा सहवास लाभला.. आणि ते शक्य झालं माझ्या मावशीमुळे.. (मावशीबद्दल स्वतंत्र लिहावंच लागेल, तर ती कळेल) खरंतर माझी आजी पुण्यात्माच, तिच्यामुळेच मी थोडीफार शांत होऊ शकलेय.


      आजीमध्ये इतकेसाऱे गुण होते की तिच्याकडून घ्यावं तितकं थोडंच. अतिशय कुशाग्र, चाणाक्ष, तीव्र स्मरणशक्ती, हसतमुख राहणे, कोणत्याही परिस्थितीत अतिशय शांत राहणारी, सर्वांवर प्रेम करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी माझी आजी.. पाण्याची उपमा तिला चपखल लागू पडू शकते, पाणी जसं कोणत्याही आकारात कोणत्याही रंगात रंगून जातं पण त्याचं अस्तित्व जसं कायम असतं, त्याच प्रमाणे होती माझी आजी. ती मुळची पुण्याची, तिचं नाव सुंदर दावलभक्त. (नाशिक जवळ दावलमलिक नावाचं एक नाथांचं स्थान आहे. तिथे त्या लोकांच्या भक्तांना दावल भगत असं नाव तिथल्या यवनांनी त्या काळी दिलं होतं.)नावा प्रमाणेच होती ती, सुंदरही आणि देवभक्तचा अपभ्रंश झालाय दावलभक्त, त्यामुळे देवभक्तही. ती दत्ताची निस्सिम भक्त होती. लग्न होऊन पुण्याजवळच्या केडगावात आली आणि मुरलीधर अवचटांची राधाबाई झाली. या राधाबाईनं आपला काळ बराच गाजवला. मुरलीधर काक आणि राधा काकू केडगावातल्या लोकांचे हक्काचे काका-काकू होते. गावातल्या सगळ्यांची जरी हक्काची काकू असली तरी घरचे सगळे तिला ताई म्हणत. तिला सहा मुलं आणि पाच मुली झाल्या ज्यापैकी चार मुलं आणि चार मुली वाचल्या ज्या पैकी सगळ्यात मोठी मुलगी तिच्या मृत्यू नंतर ७८वर्षांची होऊन गेली.

 
      कोणीही आपल्याशी कसंही वागलं तरी आपण मात्र सर्वांशी भेदभाव रहित वागावं हे तिच्याकडूनच शिकायला मिळालं.. कितीही आणिबाणीची स्थिती आली तरी आजी कायमच शांत असायची.. तिच्या इतक्या शांत असण्याचं आम्हाला कायमच कौतुक वाटायचं..
      आजी म्हणजे आमच्य़ा सगळ्यांचं हक्काचं स्थान, आदराचं स्थान, प्रेमाचं जणू विद्यापीठच..

 
या आमच्या आजीसोबत गप्पा मारण्याचा आनंद लुटणे हा माझा आणि माझ्या भावाचा आवडीचा छंद! आणि आजीही कधी आमच्यातलीच होऊन, कधी तिच्या वया प्रमाणे कधी अगदी लहान मूल होऊन बोलायची. या बोलण्यातून ती कधी गाण्यात शिरायची आणि गायला लागायची कळायचंच नाही.. आणि गाणीही कडवंन् कडवं तिच्या लक्षात. चुकूनही मागे-पुढे झालेलं तिला चालायचं नाही.. 'आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा', हे तिच्या आयुष्यातलं अविस्मरणीय प्रसंगातलं एक गीत.. हे गाणं गाण्यापूर्वीच्या तिच्या भावमुद्रा अगदी टिपण्यायोग्य असत.. तिच्या डोळ्यात वेगळीच लकाकी आलेली असे, आणि पहिलीत असताना जशी ती भारावलेली असावी तशीच आणि तितकीच भारावून ती सांगे, की महात्मा फुले मंडईत त्यावेळी पंचम जॉर्ज आला होता, त्याच्या पुढे आम्ही कन्या शाळेतल्या पहिलीतल्या मुलींनी 'आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा', हे गाणं म्हंटलं होतं...(त्याला कसलं डोंबलं कळायला..) पण या पोरींनी मात्र पंचम जॉर्ज पुढं नक्कीच शिरा ताणूताणू हे गाणं गायलं असणार हे नक्की... कारण त्याच जोशात ती आम्हालाही ते गाणं म्हणून दाखवायची.. तेंव्हा तिला बहुदा आम्हीच पंचम जॉर्ज वाटत असू!! बरं हे झाल्यावर त्या पंचम जॉर्जनं दिलेला त्याचा बिल्ला आणि काजूचा एका मुठीत मावेल इतका दिलेला पुडा ती मोठ्या तोऱ्यात आम्हाला खाणाखूणा करत सांगायची... 


हा आजीच्या आठवणींचा प्रसंगांचा खजाना आम्हाला आता अगदी क्रमाक्रमानं पाठ होता.. तरी आम्ही ते तितक्याच उत्साहाने आणि तेवढीच मजा घेत ऐकायचो.. कदाचित आमची लाडकी आजी असल्यानं आम्ही तिचा हिरमोड नाही करायचो.. पण कधी चेष्टा केली तरी ती त्याच चेष्टेतून आमची खेचायची! तिच्याशी बोलताना तिने कधीत ती किती महान आहे याची जाणीव होऊ दिली नाही... कित्येकांना माफ केलं... सर्वांवरच प्रेम केलं.. अशा कितीतरी आठवणी आहेत... पण आता थांबावं लागेल...

टिप्पण्या

  1. Pradnya, khup chan blog ahe..sagalya athawaninna ujala milala..apan bhagyawan ki apalyala ashi aaji milali..mala apali aaji mhanaje ek gyanpith watate..kiti goshti tichyakadana shikanyasarakhya ahet, tyachi ganati howu shakat nahi..apalya aajicha batawa ha kadhihi na sampanara ahe..kiti goshti ti apalyala dewun geli ahe tya apalyala ayushybhar purnarya ahet..aaj tila jaun ek varsha hotey, pan mala ti kadhihi apalyapasun dur geliye hyawer vishwasach basat nahi..ani sarakha watat rahata mala ti pancham george chi goshta tichyakadana parat aikaichiye..

    उत्तर द्याहटवा
  2. हो ना.....
    आता मी जातेय पुण्याला, आपण केडगावला तिचं वर्षश्राद्ध करतोय...
    She is always with us....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान